अलिबाग : प्रतिनिधी – रायगडच्या दक्षिण भागातील सात तालुक्यांमधील कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था हातात हात घालून पुढे सरसावल्या आहेत. रायगड जि. प.चा एकात्मिक बालविकास विभाग, स्वदेस फाऊंडेशन आणि भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना (आयएपी) यांच्यात एक सामंजस्य करार झाला असून दक्षिण रायगड कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार यानिमित्ताने करण्यात आला.
मुंबईला लागून असलेल्या रायगड जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण तुलनेत कमी असले तरी एकही बालक कुपोषित राहणार नाही या दृष्टीने आजवर अनेक उपक्रम राबविले गेले. त्यातील काही यशस्वी झाले. पुढे सातत्य न राहिल्याने अपेक्षित यश मिळाले नाही. आता जि. प.चा एकात्मिक बालविकास विभाग, स्वदेस फाऊंडेशन आणि आयएपी यांच्यात जिल्ह्यातील म्हसळा, श्रीवर्धन, तळा, पोलादपूर, महाड, माणगाव व सुधागड तालुक्यांतील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांच्या आरोग्यासंदर्भात उपचार करण्यासंबंधी सामंजस्य करार करण्यात आला.
या सात जिल्ह्यांमध्ये सध्या तीव्र व मध्यम स्वरूपाची 284 कुपोषित बालके आहेत. सामंजस्य करारानुसार पुढील पाच वर्षांत कुपोषणमुक्त दक्षिण रायगड करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची मोफत तपासणी करणार असून, जि. प. आरोग्य विभाग व एकात्मिक बालविकास योजना यांच्या वतीने आवश्यक औषधोपचार करण्यात येणार आहे. स्वदेस फाऊंडेशनच्या वतीने अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य कर्मचार्यांना प्रशिक्षण व आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
या सामंजस्य करारावर जिल्हा परिषदेतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, स्वदेस फाऊंडेशनतर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, आरोग्य विभागाचे मुख्य व्यवस्थापक डॉ. सुरेंद्र यादव, महाव्यवस्थापक तुषार इनामदार, व्यवस्थापक डॉ. सचिन अहिरे, सुधीर वाणी तसेच भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेतर्फे डॉ. चंद्रशेखर दाभाडकर यांनी स्वाक्षरी केली. रायगड जिल्ह्यामधील सात तालुक्यांतील कुपोषणमुक्तीसाठी हा प्रकल्प वरदान ठरू शकेल, असा विश्वास डॉ. किरण पाटील यांनी व्यक्त केला.