Breaking News

भरमसाठ पाणी बिलास कळंबोलीकरांचा विरोध; वाढीव दर रद्द करण्याची सिडकोकडे मागणी

पनवेल : वार्ताहर

सिडको वसाहतीत पाणीपट्टीत तिपटीने वाढ करण्यात आली होती. कोरोना काळात पाठवलेल्या सुधारित देयकाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. त्यामुळे सिडकोने या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती, परंतु आता ग्राहकांना सुधारित दरानुसार पाणी देयके पाठवण्यात आली आहेत. ही रक्कम जास्त असल्याने कळंबोलीतील रहिवाशांनी नाराजी व्यक्त करून विरोध दर्शविला आहे. याबाबत सिडकोकडे पाणी बिलाचे वाढीव दर रद्द करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही सुरू आहे. असे असताना सिडकोकडून पाणी देयकांमध्ये अन्यायकारक वाढ केली असल्याची भावना निर्माण झाली आहे. कळंबोली वसाहतीतील अल्प उत्पन्न गटातील रहिवाशांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. याकरिता त्यांचा असलेला विरोध कळंबोली विकास समितीचे अध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत पत्राद्वारे पोहचवला आहे. त्यांनी सीएमओकडेही तक्रार केली आहे. सिडको प्राधीकरण प्रति घनमीटर सात रुपये दराने रहिवाशांना पाणीपुरवठा करीत आहे. गेली 15 वर्षे त्यामध्ये कोणतीही वाढ झाली नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे म्हणणे आहे. दरम्यान, यापुढे प्रति घनमीटर 20 रुपये दराने ग्राहकांकडून आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुधारित देयके वसाहतींमध्ये पाठवण्यात आली होती. कोरोना काळातही सिडकोकडून सुधारित दराने ग्राहकांना पाणी देयके पाठवण्यात आली. त्यामुळे अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले. तीन पटीने आलेले बिल भरायचे कसे, असा प्रश्न अनेकांना पडला. दरम्यान, भाजप नगरसेवक समीर ठाकूर यांनी सिडकोला पत्रव्यवहार करून तीव्र नाराजी व्यक्त केली. ही वाढीव देयके रद्द करण्याची मागणी व्यवस्थापकीय संचालकांकडे करण्यात आली होती. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर यांनीही  या संदर्भात सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांना निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर सिडकोने पाणी बिलाच्या वाढीव दराला स्थगिती दिली होती. त्यामुळे ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच प्रति घनमीटर सात रुपये दराने पाणी बिल पाठवण्यात आले, परंतु सिडकोने याला तात्पुरती स्थगिती देत पुन्हा नव्या दरानुसार पाणी देयके ग्राहकांना देण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडली आहेत. ही वाढ अन्यायकारक असल्याची भावना रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे.

कळंबोली येथील एलजी, केएल 1 ते केएल 6 त्याचबरोबर ए आणि बी टाइपच्या घरांमध्ये माथाडी कामगार मोठ्या संख्येने राहतात. कोरोना काळात अनेकांचे हातचे काम गेले आहे. अशा परिस्थितीत सिडकोने नागरिकांचा विचार न करता पाणी बिलाच्या  दरात वाढ केली आहे. त्यामुळे पाणी बिलाचे वाढीव दर रद्द करण्यात यावे, अशी मागणी सिडकोकडे करण्यात आली आहे.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply