नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील घणसोली येथे 12 आणि नवीन पनवेल (पूर्व) येथे 15 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवळ निवासी वापराकरिता उपलब्ध असलेल्या या भूखंडांवर यशस्वी होणार्या अर्जदारांना बंगला, रो-हाऊस, इमारत किंवा निवासी प्रकारातील, त्यांच्या मनासारखे घर बांधणे शक्य होणार आहे. या भूखंडांची विक्री ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेद्वारे होणार असून अन्य प्रक्रियाही ऑनलाइन पद्धतीने पार पडणार आहेत. अर्जदारांच्या ऑनलाइन नोंदणीस 21 डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील घणसोली या विकसित नोडमध्ये सेक्टर-4 येथे एकूण 12 भूखंड व झपाट्याने विकसित होत असलेल्या नवीन पनवेल (पू.) नोड येथील सेक्टर-8 ई, 9 ई, 5 ए (ई) आणि 12 ई मधील एकूण 15 भूखंड विक्रीकरिता उपलब्ध आहेत. सदर योजनेकरिता ई-निविदा प्रक्रियेस 28 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात होऊन 13 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजता ही प्रक्रिया संपुष्टात येईल, तर ई-लिलाव प्रक्रियेस 14 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात होऊन त्याच दिवशी म्हणजे 14 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता ही प्रक्रिया संपुष्टात येईल. 15 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता या योजनेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सदर योजनेची सविस्तर माहिती जसे, अनामत रक्कम, प्रक्रिया शुल्क, भूखंडांचे स्थान, दर इ. योजना पुस्तिकेमध्ये (ीलहशाश लेेज्ञश्रशीं) नमूद असून योजना पुस्तिका हीींिीं://शर्रीलींळेप.लळवलेळपवळर.लेा या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबई आणि ठाणे शहरापासून नजीकच्या अंतरावर असणारा घणसोली हा नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन सुविधा, नामांकित शिक्षण संस्था, आरोग्य सुविधा इ. पायाभूत सुविधांनी परिपूर्ण असा नोड आहे, तर नवीन पनवेल हा नवी मुंबईतील झपाट्याने विकसित होणारा नोड असून सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, कॉर्पोरेट पार्क यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प हे पनवेल आणि नजीकच्या परिसरातच आकारास येणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करता नागरिकांना नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये त्यांच्या कल्पनेतील घर साकारण्याची सुवर्णसंधी या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे. या योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.