Breaking News

भाजपच्या कोरोनाकाळातील कार्य अहवालाचे प्रकाशन

ठाणे : प्रतिनिधी – कोरोना आपत्तीच्या काळात ठाणे शहरातील कानाकोपर्‍यात भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल आज प्रकाशित करण्यात आला. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत चार महिन्यांत केलेल्या सेवाभावी कामांची जंत्री मांडण्यात आली.

भाजपच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, प्रदेश उपाध्यक्ष माधवी नाईक, श्वेता शालिनी, सचिव संदीप लेले, शहर सरचिटणीस विलास साठे, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होती.

कोरोनाकाळात समाजातील प्रत्येक वंचित घटकाला मदत पोचेल, असे भाजपचे नियोजन होते. त्याअनुषंगाने गरजूंना अन्नपाकिटे, धान्य, ज्येष्ठ नागरिकांना घरपोच किराणा सामान व औषधे, रक्तदान, डॉक्टरांसह वैद्यकिय कर्मचार्‍यांना पीपीई किट व मास्क, सामान्य नागरिक व पोलिसांसाठी मास्क, स्थलांतरित कामगारांना अन्न व पादत्राणे, सोसायट्यांपर्यंत भाजीपाला, कोरोना चाचणीसाठी सवलतीत कमळ कवच, फिव्हर क्लिनिक, आरोग्य शिबिरे, क्वारंटाइन केंद्रातील रुग्णांना बिस्किटे व अन्नपाकिटे आदींची मदत करण्यात आली. पीएम केअर फंडातही मदत करून ठाण्यातील कार्यकर्ते व नागरिकांनी खारीचा वाटा उचलला.

या काळात सातत्याने जनतेसाठी धावून जाणारे कोरोना योद्धा नागरिक व कार्यकर्ते यांचाही भाजपने सन्मान केला. भाजपने केवळ समाजाप्रती कर्तव्यभावनेने हे कार्य केले. यापुढील काळातही भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सामान्यांच्या हाकेला धावून येईल, असे प्रतिपादन आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केले. या अहवालाच्या माध्यमातून जनतेपर्यंत माहिती पोचविण्याचा प्रयत्न आहे, असे डावखरे यांनी नमूद केले.

सामान्यांसह कोरोना रुग्णांना सुविधा मिळण्यासाठी भाजपने प्रयत्न केला. कोरोना रुग्णांना बेड व आवश्यक उपचार, रुग्णांचे डायलिसिस यांच्याबरोबरच सुमारे 850 हून अधिक गरीब मुलांना ऑनलाइन शिक्षणासाठी नेट पॅक देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

या वेळी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस, कोपरी ब्लॉक अध्यक्ष कृष्णा भुजबळ, प्रहार संघटनेचे ठाणे शहराध्यक्ष आनंद बनकर यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply