Breaking News

मशाल मोर्चाचा सर्वत्र एल्गार

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 9) उरण तालुक्यातील जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता. तेथे मुख्य मशालीने प्रज्वलित करण्यात आलेल्या मशाली सायंकाळी रायगड जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यात पोहचल्या आणि सर्वत्र ‘दिबां’च्या नावाचा जयघोष झाला.
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्याच्या मागणीसाठी ऑगस्ट क्रांतिदिनी ‘दिबां’चे जन्मगाव असलेल्या उरण तालुक्यातील जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता. नवी मुंबईच्या निर्मितीसह देशातील शेतकरी आणि कष्टकर्‍यांसाठी लोकनेते दि. बा. पाटील यांनी केलेला संघर्ष व त्याग लक्षात घेऊन तसेच भूमिपुत्रांच्या अस्तित्वाची ओळख जपण्यासाठी नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव द्यावे, ही मागणी समजून घेण्याऐवजी प्रकल्पग्रस्तांचा आवाज दाबण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारने घेतली आहे. सरकारच्या या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी जासई येथून पनवेल, उरणसह रायगड जिल्हा, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, मुंबई, पालघर येथील गावागावात मशाली प्रज्वलित करून नेण्यात आल्या. केवळ ग्रामीणच नव्हे; तर शहरी भागातही मशाल मोर्चाची धग दिसून आली.
पनवेल तालुक्यातील खारघर येथेही मशाल मोर्चा निघाला. या ठिकाणी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील, शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील तसेच केसरीनाथ पाटील, साधना पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते, तर आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, नंदू लांबे, नगरसेविका जान्हवी पंडित, युवा मोर्चा शहर अध्यक्ष निलेश पाटील, माजी नगरसेवक राजेश कोळी तसेच हस्तीमल मेहता, हितेश शाह, अजित भिंडे, मनन पटेल, सुरज ठवले, संतोष ओटावकर, मकरंद पोतदार, पुरुषोत्तम सेवक, सागर मोहिते, सीमा घरत, नयना पाटील आदी सहभागी झाले होते.
राज्य सरकारला या मशाल मोर्चातून 15 ऑगस्टची डेडलाइन देण्यात आली असून या तारखेपर्यंत सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही, तर 16 ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडण्याचा निर्धार तमाम भुमिपुत्रांनी या वेळी केला.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply