पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील आंबा उद्यानातील आंब्याच्या झाडांवरील बांडगूळ काढण्याकडे सिडको करीत असलेल्या दुर्लक्षामुळे येथील अनेक आंब्याची झाडे सुकून नष्ट होत आहेत. याबाबत भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष नगरसेवक मनोज भुजबळ व प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे यांनी सिडकोकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. सिडको वसाहत असलेल्या नवीन पनवेलमध्ये सीकेटी स्कूलजवळ व सेक्टर 15 ए मध्ये आंबा उद्यान आहे. या उद्यानात अनेक आंब्याची झाडे आहेत. झाडांवर अनेक ठिकाणी बांडगूळ आल्याने झाडे सुकून नष्ट होत आहेत. सेक्टर 15 ए मधील भुजबळ उद्यानात अशी अनेक झाडे बांडगुळामुळे नष्ट झाली आहेत. असाच प्रकार सीकेटी स्कूलजवळील आंबा उद्यानातही घडत असल्याने लवकरच ही उद्याने फक्त नावालाच आंबा उद्याने राहतील, अशी भीती नुकतीच आमदार प्रशांत ठाकूर यांनी भुजबळ उद्यानाची पाहणी केली, त्या वेळी त्यांच्याकडे व्यक्त करण्यात आली. याबाबत सिडकोच्या उद्यान विभागाकडे अनेकदा पत्रव्यवहार केला, पण कारवाई होत नसल्याची माहिती नगरसेवक मनोज भुजबळ आणि प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना दिली. या वेळी भुजबळ उद्यानातील बांडगूळ लागलेली झाडे आणि सुकून नष्ट झालेली झाडे दाखवून झाडे किंवा त्यांच्या फांद्या तोडल्यास सामान्य नागरिकाला दंड केला जातो. सिडकोने वेळीच याची दखल न घेतल्यास त्यांच्यावर ही झाडे मारल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे नगरसेवक मनोज भुजबळ आणि प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे यांनी सांगितले.
आम्ही आमच्या हार्टीकल्चर अधिकार्यांना त्याची पाहणी करण्यास सांगू. बांडगुळामुळे आंब्याची झाडे नष्ट होत असल्यासबांडगूळ काढून टाकू. -मेहबूब मुलाणी, कार्यकारी अभियंता, सिडको