खोपोली : प्रतिनिधी
भुयारी गटार योजना लालफितीत अडकल्याने खोपोली शहरातील सर्वच गटारे उघडी आहेत. त्यातील बहुतांश गटारे तुटली असल्याने त्यातून सांडपाणी निचरा होण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे सदासर्वकाळ खोपोली शहरातील गटारे तुंबलेल्या स्थितीत आहेत. त्यात औषध फवारणी नियमितपणे होत नसल्याने खोपोलीत डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दरम्यान, शहरात स्वच्छता सर्वेक्षण अभियान मोहीम जोरात सुरू झाली आहे, मात्र उघडी व तुंबलेली गटारे या स्वच्छता अभियानाच्या यशात अडथळा ठरणार आहेत. अनेक वर्षांपासून मंजूर असलेली खोपोली शहर भुयारी गटार योजना अद्याप बासनात पडून आहे. त्यामुळे खोपोली शहरातील सर्व सांडपाणी उघड्या गटारांतून सोडण्यात येत आहे. ही गटारे ठिकठिकाणी नादुरुस्त व तुटल्याने त्यातील सांडपाणी जागोजागी तुंबत आहे. गटार सफाईसाठी होत असलेली दिरंगाई व अनियमित डास निर्मूलन औषध फवारणी यंत्रणेमुळे खोपोलीची मूलभूत नागरी स्वच्छताच सध्या वार्यावर आहे. सांडपाण्याचा निचरा सुरळीत होत नसल्याने व उघड्या गटारांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि डास व मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. डास-मच्छरांपासून बचाव करण्यासाठी शहरातील प्रत्येक कुटुंबाकडून आर्थिक खर्च करून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी प्रत्येक कुटुंबाला महिन्याला मोठी आर्थिक रक्कम खर्च करावी लागत आहे.
शहरात धूर फवारणी नियमितपणे होत नाही. गटारे सफाई होत नाही. बहुतेक सर्व गटारे उघडी असल्याने सांडपाणी तुंबून दुर्गंधी व डास-मच्छरांचे प्रमाणवाढले आहे. तुटलेल्या गटारांची दुरुस्तीची कामेही लटकली आहेत.
-सुहास सेलूकर, नागरिक, खोपोली
न. प.तर्फे सार्वजनिक स्वच्छता व गटारांची साफसफाई नियमित होत आहे, मात्र गटारे तुटल्याने साफसफाईसाठी अडचणी येतात. अनेक गटारांची कामे मंजूर असून लवकरच कामांना सुरुवात होईल.
-सुमन औसरमल, नगराध्यक्ष, खोपोली