घरमालकांना पोलिसांनी दिल्या सुचना
पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल तालुक्यातील फार्महाऊस (शेतघर)वर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाटर्यांचे आयोजन केले जाते. यावर्षी कोरोनामुळे फार्महाऊसवर गर्दी होऊ नये व नियमांचे पालन व्हावे यासाठी पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. त्यामुळे फार्महाऊस मालकांसोबत बैठका घेत याबाबतच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत.
पोलीस उपायुक्तांनी सर्वच पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना फार्महाऊस मालकांना सूचना देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खांदेश्वर, पनवेल तालुका आणि पनवेल शहर पोलीस ठाण्यांमध्ये या बैठकांचे सत्र सुरू आहे. परिमंडळ दोनचे उपायुक्त शिवराज पाटील यांनी त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक वर्षी स्वमालकीच्या शेतघरांवर पार्टी करण्यासाठी कोणासही बंधन नाही, मात्र या वेळी कोरोना संकटामुळे सरकारने घातलेले नियम पाळून एकत्र येण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात येत आहेत. पालिसांची परवानगी घेऊनच 50हून अधिक व्यक्ती एका पार्टीत नसतील याची दक्षता घेण्यात येत आहे. तसेच कोरोनाच्या इतर नियमांचेही काटेकोर पालन करण्याबाबत सांगितले जात आहे.
तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 2021 च्या स्वागताच्या बंदोबस्ताची सर्व तयारी झालेली आहे. यात कोरोना संसर्गजन्य नियम उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकांवर ड्रंक अन्ड ड्राइव्हच्या कारवाई करण्यात येतात. यावर्षी संचारबंदी असली तरीही मुख्य रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त असणार आहेत. सर्व चौकात ब्रेथ अनायझर सहवाहतूक पोलीस तैनात असतील. शीव-पनवेल आणि ठाणे-बेलापूर महामार्गावर पोलिसांची नजर असणार आहे. राज्यात मंगळवारी रात्रीपासून 5 जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याने सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री होणार्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी झाला असला तरी नवी मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल असे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी सांगितले.