मुरूड : प्रतिनिधी
येथील स्टार फाऊंडेशनतर्फे मुरूड शहरातील सुमारे 330 कुटुंबांना पंतप्रधान जनआरोग्य योजनेच्या प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. पंतप्रधान जनआरोग्य योजना केंद्र शासनाकडून राबवली जात असून, या योजनेंतर्गत नामांकित हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च केंद्र शासनाकडून केला जाणार आहे. स्टार फाऊंडेशनने संगणकाचा वापर करून ज्यांची नावे या योजनेत आली आहेत, त्यांची प्रमाणपत्रे काढून ती संबंधितांच्या घरापर्यंत पोहचवण्यात आली आहेत. सदर प्रमाणपत्रावर असणार्या नंबरच्या आधारावर नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार मिळणार आहेत.
आयुष्यमान भारत योजनेत पंतप्रधान जनआरोग्य योजनेचा फायदा मिळत असतो. त्याबद्दलची माहिती संगणकावर असल्याने ग्रामीण भागातील जनतेला ती ठाऊक नसते. आमच्या संस्थेने लाभार्थ्यांची नावे शोधली व प्रमाणपत्रे काढून त्यांच्या घरी पोहचवली, जेणेकरून कुटुंबांना आरोग्यसाठी उपयोग होईल. आतापर्यंत मुरूड शहरात 330 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
-जाहिद फकजी, अध्यक्ष, स्टार फाऊंडेशन, मुरूड