देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी; राजस्थान पराभूत
मुंबई ः प्रतिनिधी
आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)ची विजयी घोडदौड सुरुच असून, राजस्थानविरुद्धचा सामना जिंकत बंगळुरूने एकही गडी न गमावता आरामात जिंकला आणि विजयी चौकार मारला. राजस्थानने विजयासाठी दिलेले 178 धावांचे लक्ष्य बंगळुरूने कर्णधार विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या सलामीवीर जोडीने 16.3 षटकांत 10 गडी राखून सहज पार केले. झंझावाती शतकी खेळी करणारा पडिक्कल सामनावीर किताबाचा मानकरी ठरला.
देवदत्त पडिक्कलला राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सूर गवसला. त्याने आयपीएल स्पर्धेतील त्याचे पहिले शतक झळकाविले. यापूर्वीच्या दोन सामन्यांत तो झटपट बाद झाला होता. अखेर राजस्थानविरुद्ध त्याने तडाखेबंद शतक ठोकून मागील दोन सामन्यांतील अपयश पुसून टाकले. पडिक्कलने 52 चेंडूंत नाबाद 101 धावांची खेळी केली, तर विराटने 47 चेंडूंत 72 धावा केल्या. राजस्थानच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात सपशेल अपयश आले.
तत्पूर्वी, राजस्थानचे सुरुवातीला चार गडी झटपट बाद झाल्यानंतर संघ दडपणाखाली आला होता. पाचव्या गडीसाठी शिवम दुबे आणि रियान पराग जोडीने राजस्थानचा डाव सावरला, मात्र ही जोडी फोडण्यात हर्षल पटेलला यश आले आहे. तिथपर्यंत या जोडीने राजस्थानचा डाव सावरला होता. चुकीचा फटका मारण्याच्या नादात पराग हा युजर्वेंद्र चहलच्या हाती झेल देऊन बाद झाला, तर दुबे हा केन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या ग्लेन मॅक्सवेलच्या हाती झेल देऊन बाद झाला. दुबेने 32 चेंडूंत 46 धावांची खेळी केली. परागने 16 चेंडूंत 25 धावा जोडल्या. त्यानंतर राहुल तेवतियाने चांगली फलंदाजी केली. त्याने 23 चेंडूंत 40 धावा केल्या. याआधी जोस बटलर, मनन वोहरा, डेव्हिड मिलर आणि संजू सॅमसन स्वस्तात तंबूत परतले होते. बंगळुरूकडून मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करीत चार षटकांत 27 धावा देत तीन गडी बाद केले. हर्षल पटेलची गोलंदाजी महागडी ठरली, परंतु त्याने चार षटकांत 47 धावा देत 3 गडी बाद केले. सध्या पटेल पर्पल कॅपचा मानकरी आहे.