पेण : प्रतिनिधी
पश्ाुसंवर्धन विभागाच्या अंतोरे फाटा (ता. पेण) येथील पोल्ट्रीतील 562पैकी 281 कोंबड्या बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यातील पाच मृत कोंबड्यांचे नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवल्या असता ते पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या पोल्ट्रीच्या 10 किलोमीटर परिसरातील पक्ष्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपाय योजना केल्या जात आहेत. तर एक किलोमीटर परिसरातील अंतोरे, पाटणेश्वर, तरणखोप, हुडको विभागामधील कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. पेण तालुक्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झाली असली तरी जनतेने घाबरून जाऊ नये. या संदर्भातील प्राथमिक आम्ही केल्या असून सर्व दक्षता घेतली आहे. तसेच चिकन व अंडी खाण्यास काहीही हरकत नाही. मात्र ते 70 डिग्री अंश सेल्सिय तापमानाच्या वर शिजवून खावे, असे पशू वैद्यकीय अधिकारी अर्चना जोशी यांनी सांगितले आहे. बर्ड फ्लूबाबत जनजागृती म्हणून पेण शहरातील नगरसेवकांची बैठक घेतली असून, शहरातील जनतेने पश्ाुसंवर्धन खात्याला सहकार्य करावे, असेही आवाहन डॉ. अर्चना जोशी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केले. पश्ाुसंवर्धन विभागाच्या अधिकारी, कर्मचार्यांनी पोलीस बंदोबस्तात गुरुवारी (दि. 21) पेण शहरात घरोघरी तपासणी करून संशयित पक्षी जमा करून ते नष्ट केले.