गणेशभक्तांसह ग्राहकांमध्ये समाधान
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
गेल्या महिन्यात तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जाचे भारताच्या बाजारपेठेत पडसाद पाहायला मिळाले होते. लगेचच मुंबई एपीएमसी बाजारात सुक्यामेव्याच्या बाजारभावात वृद्धी झाली होती, परंतु गणेशोत्सवात तोंडावर आला असताना सुक्यामेव्याचा बाजारभाव स्थिर असल्याने गणेशभक्तांसह ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सर्वांच्याच पसंतीचे आणि अधिक खाल्ले जाणारे बदाम 1000 ते 1150 रुपये प्रतिकिलोवरून 800 रुपये प्रतिकिलो झाल्याने 250 रुपयांचे किलोमागे घसरण झाली. त्यामुळे यंदाच्या उत्सवात सुक्यामेव्याच्या प्रसादाने भक्तांचे तोंड गोड होणार असल्याचे दिसत आहे. शिवाय अफगाणिस्तानातील सुकामेवा येणे सुरू झाले असून, पूर्वीचा साठा पाहता पूर्ण दोन वर्षे पुरेल एवढा साठा राज्यात असल्याचे सुकामेवा व्यापार्यांनी सांगितले. त्यामुळे सुकामेव्याचे भाव हे आणखी काही दिवस तरी वाढणार नसल्याचा व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एपीएमसी मार्केटमध्ये सुकामेवा घेण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली.
मुंबई एपीएमसी मसाला मार्केटमध्ये देश-परदेशातून मोठ्या प्रमाणात सुकामेवा आयात होतो. शिवाय जवळपास सात ते आठ हजार कोटी रुपयांची उलाढाल वर्षाला बाजारात होत असते. तर जवळपास 30 ते 40 व्यापारी अफगाणिस्तानवरून माल आयात करतात. जवळपास 38 हजार मेट्रिक टन सुकामेवा मार्केटमध्ये आयात केला जातो. त्यामुळे येत्या सणांना बाजारभाव गगनाला भिडतील, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
श्रावण महिन्यापासून येणार्या सणांना मोठ्या प्रमाणात सुक्यामेव्याची मागणी असते. त्यामुळे अफगाणिस्तानचे बँकिंग क्षेत्र चालू न झाल्यास मालाचा तुटवडा होऊन बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली गेली होती. शिवाय त्यावेळी बाजारात बदामाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र सध्या 250 रुपये प्रतिकिलो घसरण झाल्याचे मसाला मार्केट व्यपार्याने सांगितले. मात्र, किरकोळ बाजारावर नियंत्रण नसल्याने अधिक दराने विक्री केली जाते.