Breaking News

सक्तीच्या वीजबिलाविरोधात राज्य सरकारला इशारा

नवी मुंबई भाजप उतरणार रस्त्यावर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीच्या वीजबिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

यापूर्वीच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत ते कार्यकर्ते जामीन न घेता जनतेसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवून आहेत, अशी माहिती शुक्रवारी (दि. 22) वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप पदाधिकार्‍यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात अनेक नागरिकांचे रोजगार गेले असून, व्यवसाय बंद झाले आहेत. याकाळात महावितरणने रिडिंग न घेता सरासरी वीजबिल पाठविली आहेत. याकाळात विजेचे दरदेखील वाढविण्यात आले असून, सक्तीने वीजबिलांची वसुली करण्याचे तसेच थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या तोडण्याचे फर्मान राज्य सरकारने काढले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

वाढीव वीजबिल रद्द करावीत आणि सक्तीने वीजबिल वसूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी केली.  300 युनिटपर्यंत वीजबिल माफ करण्याचे आश्वासन महाविकास आघाडी सरकारने दिले होते. हे आश्वासन खोटे ठरले. कठीण काळामध्ये सरकारने जनतेला दिलासा द्यायला हवा, परंतु या सरकारने जनतेला उद्ध्वस्त करण्याचे ठरवले असल्याचा आरोप माजी नगरसेवक दशरथ भगत यांनी केला. महाविकास आघाडी सरकारने अन्यायाची परिसीमा केली आहे. या सरकारचा मनमानी कारभार सुरू असून, जनतेचे गार्‍हाणे ऐकले जात नसल्याची टीका माझी नगरसेवक अनंत सुतार यांनी केली.

नवी मुंबई शहरातून महावितरणला सर्वांत जास्त उत्पन्न वीजबिलामधून मिळते त्या नवी मुंबईतील ग्राहकांवर वीज दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे असल्याचा आरोप माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी केला. कोरोना काळात महावितरणकडून ग्राहकांना वीजबिल वेळेवर देण्यात आली नाहीत त्याचा भुर्दंड मात्र ग्राहकांवर टाकण्यात आला महावितरणची चूक असताना ग्राहकांनी हा भुर्दंड का भरावा? असा सवाल माजी महापौर जयवंत सुतार यांनी केला.

वाढीव वीजबिले आणि जबरदस्तीने केल्या जाणार्‍या वीजबिल वसुलीमुळे नवी मुंबई भाजपतर्फे शहरातील सर्वच नोडमध्ये शुक्रवारी महाविकास आघाडी सरकाराच्या विरोधात निषेध आंदोलने करण्यात आली. या पत्रकार परिषदेला माजी महापौर सागर नाईक, सुधाकर सोनावणे, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मागील वेळेस झालेल्या वीज आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्या कार्यकर्त्यांचा पत्रकार परिषदेमध्ये सन्मान करण्यात आला. जनतेवरील अन्याय नाहीसा करण्यासाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी बेल न घेता तुरुंगात जाण्याची तयारी असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply