Breaking News

बारशीवमध्ये आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रेवदंडा ः प्रतिनिधी

मुरूड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीतील बारशीव येथे रात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत घराचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचा मोठा भडका उडाल्याने आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला होता. स्थानिक युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीचा भडका पसरत होता. येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश घाटवळ यांनी रेवदंडा पोलीस ठाण्याचे इन्चार्ज पो. नि. सुनील जैतापूरकर यांना घटनेची माहिती दिली. या वेळी साळाव जेएसडब्ल्यू कंपनीशी संपर्क साधून तेथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने पाण्याच्या जोरदार फवारणीने आग आटोक्यात आणली. या आगीत घरातील गॅस सिलिंडरचा भडका उडाला असता तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. अशा वेळी जीव धोक्यात घालून बारशीव येथील परेश महाडिक यांनी घरात प्रवेश करून गॅस सिलिंडर बंद करून बाहेर काढला. त्यांना निखिल महाडिक, केशव कासार, विश्वास दिवेकर यांनी मदत केली. आगीत घराचे मोठे नुकसान झाले असून रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारी जाधव, नलावडे व इतरांनी घटनास्थळी भेट दिली. मुरूड तहसीलदारांनीही सकाळी बारशीव येथील आगीत नुकसान झालेल्या घराची पाहणी केली. रेवदंडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply