Breaking News

राज यांचे अरण्यरुदन

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत. भाषण चांगले करतात, पण त्या भाषणाचे मतात रूपांतर करण्यास ते नेहमीच अपयशी ठरतात. आता सुद्धा ते भाजपच्या विरोधात प्रचारसभा घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादीला मतदान करा, असे सांगत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसवाले किती भ्रष्ट आहेत हे सांगणारे राज ठाकरे आता काँग्रेसचे गुणगाण गाताना दिसत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेचे एकांडे शिलेदार राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईच्या शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपवर टीकेची गरळ ओकली. त्यांचे हे एक अरण्यरुदनच म्हटले पाहिजे. मुळात मनसेचे अस्तित्व आता कमी झालेले आहे. मागील लोकसभा निवडणुकीतच मनसेचे 12 वाजले होते. सन 2009 मध्ये पहिल्याच विधानसभा निवडणुकीत तब्बल 13 आमदार निवडून आलेल्या मनसेला सन 2014च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अवघ्या एका आमदारावर मनसेची बोळवण झाली. त्या एका आमदाराने देखील गेल्याच महिन्यात शिवसेनेत प्रवेश करून मनसेचे विधानसभेतील दुकानच बंद करून टाकले आहे. त्यामुळे राज ठाकरे हे एकप्रकारे राजकीयदृष्ट्या बेकारच झालेले आहेत. आता काहीच काम नाही तर चला कुणाची तरी सुपारी घेऊन थेट पंतप्रधानांवरच आरोप, प्रत्यारोप केले तर आपला घसरलेला टीआरपी टिकविण्याचा केविलवाणा प्रयत्न राज ठाकरे हे करू लागलेत असेच उपहासाने नमूद करावे लागेल. गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपला साथ द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदासाठी किती योग्य आहेत असा दावा करून काँग्रेस, राष्ट्रवादीला नेस्तनाबूत करण्याची भीमगर्जना करणारे राज ठाकरे या वेळच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला विजयी करा, असे सांगत राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे राजा, कोण होतास तू, काय झालास तू, असं म्हणण्याची वेळ आता मनसे कार्यकर्त्यांवर आलेली आहे. आता केवळ काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सूचनेवरून राज ठाकरे हे राज्यभरात प्रचारसभा घेऊन मोदींविरोधात वातावरण निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. त्याचा मतदारांवर काडीमात्र परिणाम होणार नाही. राज ठाकरे यांच्या केवळ सभा घेऊन वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही. कारण सध्या दोन्ही काँग्रेसकडे बोलणारा नेताच उरलेला नाही. जे आहेत ते आपापल्या इलाख्यापुरतेच मर्यादित आहेत. त्यामुळे सभेला आकर्षित करू शकणारा नेता कोणीच नसल्याने दोन्ही काँग्रेसवाल्यांनी राज ठाकरे यांना आयात करून भाजप, शिवसेनेवर टीका करण्यास भाग पाडले आहे. राज ठाकरे हे बारामतीचे पोपट आहेत, त्यांचे स्क्रीप्ट कुठून लिहून येते हे आपल्याला चांगले ठाऊक आहे, हे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच अनेकदा जाहीर केलेले आहे. सध्या त्यांच्याकडे काहीच काम नसल्याने ते असे आरोप करीत सुटलेले आहेत. त्याचा भाजपच्या प्रतिमेवर काहीही परिणाम होणार नाही, असा दावा भाजपने केलेला आहे.त्याचे प्रत्यंतर येणार्‍या काळात सार्‍या देशवासीयांना दिसून येणार आहे. राज ठाकरे यांचे हे अरण्यरुदन इलेक्शनचा माहोल असेपर्यंत असेच चालणार आहे. निवडणुकीचा बाजार उठला की आपोआपच काँग्रेस, राष्ट्रवादीचे दुकान बंद होईल आणि त्या दुकानातून माल घेणार्‍यांचेही रेशन आपोआपच बंद होईल.

Check Also

संगीतकार राजेश रोशन 50 वर्षांचे करियर : एक रास्ता है जिंदगी…

यश चोप्रा निर्मित व रमेश तलवार दिग्दर्शित दुसरा आदमी (1977) या चित्रपटातील चल कहीं दूर …

Leave a Reply