Breaking News

कलाकारांची अचूक निवड करणारे कास्टिंग डिरेक्टर रोहन म्हापूसकर

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीला चांगले दिवस आले आहेत. अनेक मालिकाही सध्या लोकप्रिय होत आहेत. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक चित्रपट, मालिका येत आहेत, त्यातच अनेक ऐतिहासिक, चरित्रपट चित्रपटांची, मालिकांची निर्मिती होत आहे. या सार्‍या सिनेमा, मालिकांसाठी गरज असते ती कलाकारांची. कलाकारांची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची असते. सिनेमामध्ये असलेल्या पात्रांची निवड योग्य झाली की दिग्दर्शनकाचे मोठे काम होऊन जाते. त्यामुळे सध्या कास्टिंगसाठी महत्त्व प्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वी सिनेमांमध्ये कास्टिंग इतके महत्त्वाचे मानले जात नव्हते, पण आता त्याला खूपच महत्त्व आले आहे. सध्या मराठी व हिंदी सिनेमासृष्टीत कोकणातील श्रीवर्धन (जि. रायगड) येथील रोहन म्हापूसकर यांनी आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कास्टिंगच्या प्रांतात आज रोहन म्हापूसकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कोकणवासीयांसह रायगडवासीयांसाठी ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

रोहन म्हापूसकर हे श्रीवर्धनमधील. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्रीवर्धनमध्येच झाले. त्यांचे काका राजेश म्हापूसकर हे सिनेमासृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आहेत. काकांचा हात धरून ते मुंबईला आले, पण त्यानंतर त्यांनी आपल्या टॅलेन्टच्या जोरावर या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. म्हापूसकर यांनी अल्पावधीतच या क्षेत्रात मोठे यश मिळविले आहे. कामावरील प्रामाणिक विश्वास आणि त्यांनी कास्टिंगसाठी घेतलेले प्रयत्न हे यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच त्यांना यश मिळाले आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कलाकारांची अचूक निवड ही म्हापूसकर यांची ओळख आहे.

रोहन म्हापूसकर यांनी सुरुवातीला थ्री इडियटस चित्रपटासाठी कास्टिंग, सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई अशा अनेक चित्रपटांसाठी कलकारांची निवड केली. फेरारी की सवारी या चित्रपटासाठी त्यांनी एका नव्या चेहर्‍याच्या मुलाची निवड केली. ती अगदी परफेक्ट ठरली. पुढे त्यांनी अनेक चित्रपटांसाठी कास्टिंग केले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जीवनावर चित्रपट काढण्याचे ठरले तेव्हा कलाकारांची निवड करण्याची जबाबदारी रोहन म्हापूसकर यांच्यावर सोपविण्यात आली व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. बालपणीचा सचिन, सचिनचे गुरू रमाकांत आचरेकर, प्रा. रमेश तेंडुलकर हे चेहरे त्यांनी हुबेहूब निवडले. राजेश म्हापूसकर व रोहन म्हापूसकर यांनी व्हेंटीलेटर या आशयघन चित्रपटाची निर्मिती केली व त्यांची खूप चर्चा झाली. या चित्रपटासाठी जवळपास 140 कलाकारांची निवड रोहन म्हापूसकर यांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील चित्रपटाची निर्मिती खासदार संजय राऊत यांनी केली. या चित्रपटातील कलकारांची निवड करण्याची जबाबदारी म्हापूसकर यांनी सांभाळली. बाळासाहेबांसाठी झालेली नवाजुद्दीन सिद्दीकीची निवड योग्य ठरली. मनोहर जोशी, बाळासाहेब सावंत, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, उद्धव ठाकरे, राज ठकारे, स्व. मीनाताई ही सारी पात्रे त्यांनी अत्यंत मेहनतीने व कौशल्याने शोधली. खासदार गजानन कीर्तिकर यांच्यासाठी कुणी चेहरा मिळत नसताना आपल्या बाबांमध्ये त्यांनी गजानन कीर्तिकर पाहिले व त्यांना ही संधी दिली.

कोकणाने आजवर अनेक कलाकार मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. अनेक कलाकार कोकणात आहेत, मोठे टॅलेंट कोकणात आहे व या टॅलेंटला पुढे आणण्याचे काम म्हापूसकर यांनी केले आहे.

कोकणातील अनेक कलकारांना त्यांनी काम करण्याचीं संधी दिली आहे. अक्षता कांबळी, अमोल यादव, प्रफुल्ल घाग, ओंकार भोजने, प्रभाकर डाऊल, सुनील बेंडखळे, शेखर जोशी अशी कितीतरी मोठी यादी सांगता येईल. कलाकारांची निवड करताना केवळ चेहरा आणि अभिनय याला महत्त्व देतात. बाकी कुठल्याही गोष्टीकडे ते पाहत नाहीत, हे विशेष.

त्यांनी कास्टिंग केलेला हिरकणी हा चित्रपट लवकरच पे्रक्षकांच्या भेटीला येतोय, या चित्रपटातील सात कलाकारांचा समावेश असलेले शिवराज्याभिषेक गीत नुकतेच प्रदर्शित झाले, पण अन्य कलाकरांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. रोहन म्हापूसकर यांनी एकंदरीत या नव्या क्षेत्रात आपले टॅलेंट दाखविताना कोकणचे नावही पुढे आणले आहे.

– योगेश बांडागळे (मो. क्र. 9923428838)

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply