मुंबई ः प्रतिनिधी
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी एकीकडे भाजप वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही असतानाच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर स्वकियांचाही दबाव वाढताना दिसत आहे. विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याची माहिती मिळत आहे. 1 मार्चपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे. त्याआधी वनमंत्री राठोडांचा राजीनामा घेण्यासाठी आता भाजपसह मुख्यमंत्र्यांचे स्वकीयही आग्रही आहेत.
याबाबत विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता आहे. या संदर्भात त्यांनी एक पत्र लिहिले असून त्यामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून कामे होत नसल्याच्या तक्रारीदेखील असून गेल्या पाच वर्षांत पक्ष संघटनेसाठी त्यांनी कोणतेही काम केले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. संजय राठोडांमुळे पक्षाचे काम करण्यात स्थानिक पातळीवर अडचणी येत असल्याचे विदर्भातील शिवसेना लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगणार आहेत. त्यावर आता पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी खासदार कृपाल तुमाने (रामटेक), भावना गवळी (वाशिम यवतमाळ), प्रतापराव जाधव (बुलडाणा) यांच्यासह आमदार संजय रायमुलकर (मेहकर), आमदार संजय गायकवाड (बुलडाणा), आमदार नितीन देशमुख (बाळापूर), आमदार गोपीकिशन बाजोरिया (वि. प. सदस्य), विप्लव बाजोरिया (वि. प. सदस्य आमदार), आशिष जयस्वाल (रामटेक अपक्ष), आमदार नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) आदी लोकप्रतिनिधींचा दबाव असल्याची सूत्रांची माहिती आहे.
…अन्यथा अधिवेशन चालूच देणार नाही
वनमंत्री संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अधिवेशनाच्या आधी त्यांचा राजीनामा घेणार, असे बोलले जात आहे, मग हे सरकार कसली वाट पाहत आहे. महिलांवर अत्याचार करणार्या मंत्र्यांना संरक्षण देणारे हे सरकार आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही अधिवेशन चालूच देणार नाही, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
संजय राठोडांनी स्वत: राजीनामा द्यावा -तृप्ती देसाई
वनमंत्री संजय राठोड यांनी स्वत: राजीनामा देणे गरजेचे आहे. त्यांचे कथित फोटो आणि ऑडिओ क्लिप्स समोर आल्या आहेत. पोहरादेवीतील शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर संजय राठोड यांनी स्वतः राजीनामा देणे गरजेचे आहे. उद्धव ठाकरे स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचा मान राखून संजय राठोड यांनी स्वत: राजीनामा दिला पाहिजे, असे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला नाही, तर आम्हीही आक्रमक होऊन आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सुभाष देसाईंनी जोडले माध्यमांसमोर हात
शिवसेना नेते सुभाष देसाई यांना वनमंत्री संजय राठोड यांच्यावरील प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर न बोलता हात जोडले. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे त्यांनी टाळले. त्यामुळे संजय राठोड यांचा पाय आणखीनच खोलात असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे सांगितले जात आहे.
Check Also
पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव
खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …