Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या शेतकर्यांचा मोर्चा

 विनावापर जमिनी परत मिळाव्यात : प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेची मागणी

पेण : प्रतिनिधी

विशेष आर्थिक क्षेत्र विकसीत करण्यासाठी पेण, पनवेल व उरण या तीन तालुक्यातील 45 गावांमधील जमिनी अधिसूचित करण्यात आल्या होत्या मात्र ती जमीन विनावापर पडून आहे. सदर जमिनी आजतागायत मुळ मालकांना परत न केल्याने राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेच्या वतीने शुक्रवारी (दि. 5) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर मोकाशी यांनी पेण येथे पत्रकार परिषदेत दिली.

महामुंबई सेझ (विकासक गुजरात पोसिट्रा पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर लि.) यांनी खोपटा  येथे 10 हजार हेक्टर भूखंडावर बहुद्देशीय विशेष आर्थिक क्षेत्र प्रस्तावित केले होते. सदर प्रकल्पासाठी पेण, पनवेल व उरण या तीन तालुक्यातील 45 गावांमधील एक हजार 874 हेक्टर क्षेत्राचे साठेकरार व कधीही नष्ट ना होणारी कुलमुखत्यारपत्रे नोंदणीकृत करून घेतली होती. त्याचा गैरवापर करून विशेष भूसंपादन अधिकारी व कंपनीच्या कुलमुखत्यारपत्रधारकांनी संगमताने शेतकर्‍यांच्या गैरहजेरीत निवाडे घोषित केले. सदर निवाडे अंतिम निवाडे नसतानासुद्धा विशेष भूसंपादन अधिकार्‍यांनी सदर जमिनीचा ताबा विकासक कंपनीला दिला असल्याचा आरोप प्रभाकर मोकाशी यांनी या वेळी केला.

 मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र हा प्रकल्प मल्टीप्रोडक्ट (बहुउद्देशीय) असून सदर प्रकल्प विकसीत करण्यासाठी 1000 हेक्टर ते 5000 हेक्टर इतक्या सलग साधलेल्या जमिनीचे संपादन होणे सेझच्या कायद्याला अभिप्रेत होते. तथापि संपादित झालेले क्षेत्र हे एकसंघ व सांधलेले नसल्याने विकासक कंपनी आजमितीस मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र विकसीत करु शकली नाही. परिणामी या प्रकल्पासाठी संपादीत केलेली जमिन बेकायदेशीररित्या विनावापर पडून आहे. त्यामुळे सदर जमिनीच्या सातबारा उतार्‍यावरील मे. मुंबई विशेष आर्थिक क्षेत्र लि. या नावाच्या नोंदी रद्द करुन, सदर विनावापर पडून असलेली जमीन मुळ शेतकर्‍यांना परत करुन सातबार्‍यावरील नोंदी पुर्ववत करुन देणे ही महाराष्ट्र शासनाची नैतिक जबाबदारी होती. तथापि राज्य शासनाने आजमितीस सदर जमिनी मुळ शेतकर्‍यांना परत केल्या नाहीत. त्या बद्दल शासनाचा निषेध करण्यासाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून शुक्रवारी (दि. 5) अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व बाधित शेतकर्‍यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता अलिबागमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष अरुण पाटील यांनी या पत्रकार परिषदेत केले. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा वर्तक, कार्याध्यक्ष अरुण पाटील, कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. डी. पी. म्हात्रे उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply