सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांचा सवाल
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात रोहा व मुरुड तालुक्यातील प्रस्तावित फार्मा प्रकल्पाला केंद्र सरकारच्या रसायन व खत मंत्रालयाने तत्त्वतः मंजुरीच दिलेली नाही. असे असताना राज्य सरकार या प्रकल्पासाठी भूसंपादनाची घाई करत आहे, असा आरोप सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी अलिबाग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
मुरुड आणि रोहा येथील प्रस्तावित फार्मा प्रकल्प रद्द करावा, या मागणीसाठी उल्का महाजन यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेतली. यावेळी स्थानिक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनही देण्यात आले. त्यापूर्वी उल्का महाजन पत्रकारांशी बोलत होत्या.
या फार्मा प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी आणि रहिवाशी भुमिहीन होणार आहेत, याचे सामाजिक, आर्थिक परिणाम त्यांच्या जीवनमानावर होणार आहेत. पिकती जमीन आणि घरे गेल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे स्थानिकांनी कायदेशीर हरकत नोंदवली आहे, त्यामुळे प्रकल्पासाठी सुरु असलेले भुसंपादन थांबविण्यात यावे, अशी मागणी महाजन यांनी केली.
बल्क ड्रग प्रकल्पाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रासायनिक प्रकल्प रायगडकरांच्या माथी मारला जाणार आहे. त्यामुळेही या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. कुठलाही प्रकल्प आणताना स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. मात्र या प्रकल्पाबाबत स्थानिकाशी चर्चाही करण्यात आलेली नाही. रोजगाराचे आमिश दाखवून यापुर्वी अनेक प्रकल्पासाठी भुसंपादन झाले आहे. मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न 40 वर्षे झाली, तरी सुटलेले नाहीत. इको सेन्सिटीव्ह झोनमधील आणि जवळील गावांचे या फार्मा प्रकल्पासाठी भुसंपादन केले जात आहे. हा प्रकल्प रद्द करावा आणि भुसंपादन प्रक्रिया थांबवावी, अशी मागणी उल्का महाजन यांनी या वेळी केली.
सुनील तटकरे यांनी कोकणात यापुढे एकही रासायनिक प्रकल्प येऊ देणार नाही, अशी भूमिका वेळोवेळी मांडली होती, मात्र आता खासदार झाल्यावर ते केंद्रीय रासायनिक मंत्र्यांकडे बल्क ड्रग प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पत्र देत आहेत, हा रायगडकरांचा विश्वासघात आहे.
-उल्का महाजन, सामाजिक कार्यकर्त्या