Breaking News

खोपटा पुलाच्या भिंतीवरील संशयास्पद मजकुराची पोलिसांकडून कसून चौकशी

परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

उरण ः वार्ताहर

खोपटा पुलाखालील भिंतीवर लिहिलेल्या संशयास्पद मजकुराची उरण पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. मजकुरातील संदेश तसेच आकडे याबाबतचे संदर्भ शोधण्याचे प्रयत्न सुरू असून, प्रथमदर्शनी हा मजकूर संशयास्पद वाटत असल्याचे उरण पोलिसांनी सांगितले.  खोपटा पुलाखाली एका खांबाच्या भिंतीवर दहशतवाद्यांशी संबंधित मजकूर आणि काही आकृत्या काढल्याचे आढळून आल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. या मजकुरात इसिस तसेच दहशतवादी अबू बकर अल बगदादीचा उल्लेख असल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. नवीन खोपटे पुलाच्या खोपटे बाजूच्या पहिल्या खांबाच्या भिंतीवर हा संशयास्पद मजकूर लिहिला आहे. रविवारी याबाबत उरण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर चौकशी आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

उरण तालुक्यात ओएनजीसी, नौदल शस्त्रागार, जेएनपीटी, वायुविद्युत केंद्र, भारत गॅससारखे महत्त्वाचे प्रकल्प असल्याने या धमकीवजा संदेशाला महत्त्व प्राप्त झाले आहे. काळ्या मार्करने तीन भागांत हे संदेश लिहिले आहेत. या संदेशात धोनी जन्नत मे आऊट, आम आदमी पार्टी, केजरीवाल यासारख्या नावांचा सांकेतिक उल्लेख करण्यात आला आहे. तसेच दहशतवादी हाफिज सईद, रहिम कटोरी, राम कटोरी यांचाही उल्लेख असून देवनागरी व इंग्रजीतील आकडे सांकेतिक भाषेत लिहिले आहेत. तसेच एक आकृती काढली असून त्यामध्ये इम्पोर्ट-एक्सपोर्ट जहाज पोर्ट (जेएनपीटी), एअर पोर्ट, गॅस पेट्रोल दाखविण्यात आले आहे, तर दुसर्‍या आकृतीत कुर्ला, गोरखपूर असा उल्लेख करण्यात आला आहे. जन्नत 50 किमी. मे मिलावट हवामे अलटी पलटी रॉकेट, तर दुनिया और पुरी कायनात हमारे लिए छोटी नाव है, जिसे नाव मे बैठके मछली पकडती हो, अशा प्रकारे असंबद्ध सांकेतिक शब्द लिहून नकाशाही तयार करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

 ज्या ठिकाणी संदेश लिहिलेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बीअरच्या बाटल्या आढळल्या आहेत. हे ठिकाण खाडीलगत आणि थंड असल्याने काही स्थानिक तरुण दारू पिण्यासाठी येथे बसतात, मात्र हस्ताक्षर आणि भाषेवरून तरी हा मजकूर कोणी स्थानिकांनी लिहिला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी येथील कॉन्टीनेंटलमध्ये येणार्‍या ड्रायव्हर आणि परप्रांतीयांवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत उरण पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल अहेर यांच्याकडे विचारणा केली असता या प्रकरणी आम्ही सगळ्या शक्यता तपासून पाहत असून त्या दिशेने तपास सुरू आहे. कोणी जाणूनबुजून पोलिसांना त्रास देण्यासाठी हा प्रकार केला आहे का, याची शक्यताही पोलीस तपासून पाहतील, असे त्यांनी सांगितले.

या सर्व चिन्हांच्या पार्श्वभूमीवर उरण, पनवेल क्राईम ब्रँच पथक, नवी मुंबई दहशतवादी पथकासह संपूर्ण नवी मुंबईची पोलीस यंत्रणा तपासाला लागली असून, स्वतः नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी खोपटा पूल येथे येऊन परिस्थितीची पाहणी केली. दुपारच्या सत्रात खोपटा पुलाला छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान, पोलिसांनी हे लिखाण काळ्या रंगाने पुसले आहे.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply