कर्जत : बातमीदार
सर्व मनोकामना सिद्धी साई मंदिर अंतर्गत चेस्ट कौन्सिल ऑफ इंडिया आणि ओम ज्वेलर्स मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पाथरज (ता. कर्जत) केंद्रातील 12 प्राथमिक शाळांना संगणक साहित्य भेट देण्यात आले.तसेच धोत्रे, धोत्रेवाडी आणि तुंगी या गावांतील विद्यार्थ्यांना 15 अँड्रॉईड एलईडी टीव्ही, तीन वायफाय, लेजर प्रिंटर आणि एक डिजिटल साऊंड सिस्टीमचे वितरण करण्यात आले.
चेस्ट कौन्सिल ऑफ इंडियाने पुरविले साहित्य येथील विद्यार्थ्यांना नक्कीच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास कर्जतचे गटशिक्षणाधिकारी दौड यांनी व्यक्त केला.
या भागातील वीजपुरवठ्याची समस्या लक्षात घेवून थोड्याच दिवसात सर्व शाळांना सौरऊर्जा युनिटची सुविधा पुरविण्यात येईल, असे आश्वासन पद्मश्री डॉ. शशांक जोशी यांनी या वेळी दिले.
चेस्ट कौन्सिल ऑफ इंडियाचे प्रतिनिधी डॉ. आगम वोरा व त्यांचे सहकारी डॉक्टर्स, साई मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सत्यजित मोहंती, चिंतामण लोहकरे, केंद्रप्रमुख पालवे, अशोक शिंगटे, मोहन शिंगटे यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.