Breaking News

लोकमान्यतेची मोहोर

पुरस्कार किंवा सन्मानाच्या मंगल प्रसंगी राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवायचा असतो आणि व्यक्तिगत ऋणानुबंध अधिक दृढ करायचे असतात हे लोकशाहीचे तत्त्वच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार या दोन्ही नेत्यांनी परस्परांतील सौहार्द न लपवता उघडपणे प्रदर्शित केले हे त्यांच्या राजकीय प्रगल्भतेचेच द्योतक आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका शानदार समारंभात पुण्यनगरीमध्ये ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. तो क्षण महाराष्ट्राच्या इतिहासात अभिमानाने नोंदवला जाईल. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 103 व्या पुण्यतिथी निमित्ताने हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. पुरस्काराचे हे 41वे वर्ष आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, सरसंघचालक बाळासाहेब देवरस अशा अनेक दिग्गजांना टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दिपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान मोदी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तेव्हा प्रमुख अतिथीच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची मांदियाळी स.प. महाविद्यालयाच्या पटांगणातील भव्य मंचावर उपस्थित होती. या पुरस्काराची एक लाख रुपयांची रक्कम तिथल्या तिथे पंतप्रधान मोदी यांनी नमामि गंगे उपक्रमासाठी दान करत असल्याचे जाहीर केले. या वेळी पुण्याशी असलेले आपले अनुबंध मोदींनी उलगडून दाखवले आणि स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये पुणेकरांचे योगदान अधोरेखित करताना लोकमान्य टिळक यांचे कार्य अजुनही पुढे नेले जात आहे याची उपस्थितांना जाणीव करून दिली. हा झाला पुरस्काराच्या वितरणाच्या तपशीलाचा भाग. पंतप्रधान मोदी यांच्यासाठी शरद पवार यांच्यासारखे कट्टर विरोधक नेते राजकीय मतभेद बाजूला ठेवून उपस्थित राहिले आणि त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते पंतप्रधान मोदी यांच्या आगमनप्रसंगी काळे झेंडे फडकवण्याचा प्रयत्न करत होते हा विरोधाभास देखील यावेळी पहायला मिळाला. शरद पवार यांच्या उपस्थितीमुळे नव्याने स्थापन झालेल्या ‘इंडिया’ नावाच्या राष्ट्रीय कडबोळ्यातील घटक पक्षाचे नेते चक्रावून गेले, परंतु त्यांचा विरोध झुगारून देत पवार यांनी पंतप्रधान मोदी यांचे पुण्यामध्ये दिलखुलास स्वागत केले. इतकेच नव्हे तर भर मंचावर खळखळून हसत कौतुकाने त्यांची पाठदेखील थोपटली. हे लोभस दृश्य यावेळी बघायला मिळाले. लोकशाहीचे हेच तर खरे सौंदर्य आहे. प्रमुख पाहुणे या नात्याने पवार यांनी मोदी यांचे मन:पूर्वक अभिनंदन करताना लोकमान्यांच्या कार्याची आठवण जागवली. या संपूर्ण कार्यक्रमात कुठलीही राजकीय पडछाया त्यांनी पडू दिली नाही ही चांगली गोष्ट झाली. वास्तविक या कार्यक्रमावर महाराष्ट्रामध्ये तरी राजकारण शिजू लागले होते. पवार यांनी मोदी यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये यासाठी महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी जंगजंग पछाडले. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी पवार यांनी या कार्यक्रमाला जाणे आवडणारे नाही असे वारंवार सांगितले तर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी कडक शब्दांत विरोध नोंदवला होता. ‘इंडिया’ या नव्या अवतारातील युपीएच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनीही उघडपणे नाके मुरडली होती. पवार यांच्यापासून फारकत घेऊन सरकारमध्ये सामील झालेले उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाच्या वेळी मंचावर उपस्थित होते. इतके प्रतिकूल वातावरण असूनही पवार यांनी मोदी यांचा कार्यक्रम चुकवला नाही. यामुळे आता राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply