मुरुड : प्रतिनिधी
कोरोना काळातील वीज बिल वसुलीसाठी महावितरणने मुरूड तालुक्यात मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यातील सुमारे 25हजार ग्राहकांकडे साडेसहा कोटी रुपयांची वीज थकबाकी असून, ग्राहकांच्या थंड प्रतिसादामुळे थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान महावितरणसमोर आहे.
महावितरणचे मुरूड तालुक्यात 20 हजार घरगुती ग्राहक असून, त्यांच्याकडून एक कोटी 75 लाख इतकी थकबाकी येणे आहे. व्यापारी व औद्योगिक जोडण्या मिळूण दोन हजार 500ग्राहकांकडून 50 लाख तर अन्य शासकीय आस्थापनांकडून (ग्रामपंचायती) बिले न चुकती केल्यामुळे तालुक्यात वीज बिलाच्या मोठ्या रक्कमांची येणे बाकी दिसत आहे. तालुक्यातील 22ग्रामपंचायतीनी पथदिव्यांचे बिल न भरल्याने थकबाकीचा आकडा वाढला आहे.
ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांचे बिल जिल्हा परिषद भरत असते, मात्र बिल वसूल करण्यासाठी ग्रामपंचायतीना नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. पथदिव्यांच्या जोडण्या तोडल्या तर गाव अंधारात जाणार आहे. याचा महावितरणने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे मत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावित- रणकडून केल्या जाणार्या कारवाईला दिलेली स्थगिती राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर आता पुन्हा महावितरणचे कर्मचारी वीज बिल वसुलीसाठी सक्रिय झाले आहेत. मुरूडमध्ये वीज बिल थकबाकी साडेसहा कोटींच्या घरात असल्याने तालुक्यात वसुली मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. थकबाकीदार ग्राहकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. थकबाकी एकरक्कमी भरता येत नसेल तर हप्त्याहप्त्याने भरण्याची सवलत देण्यात येत आहे. मात्र थकबाकी न भरणार्या ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यात येत आहेत, त्यासाठी महावितरणनेे 70 कर्मचारी नियुक्त केले आहेत. ग्राहकांनी थकित बिले वेळेवर भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण तर्फे करण्यात आले आहे.
पथदिव्यांची बिले खूप मोठ्या रक्कमेची असून ती ग्रामपंचायत भरूच शकत नाही. या जोडण्या तोडल्या तर गाव अंधारात जाणार आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न फार कमी असते, त्याचा महावितरणने सहानुभूतीपुर्वक विचार करावा.
-मनीष नांदगावकर, सरपंच, ग्रामपंचायत उसरोली, ता. मुरूड
मुरुड तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींनी पथदिव्यांची बिले गेल्या नऊ महिन्यांपासून भरलेली नाहीत. त्यामुळे वीज बिल थकबाकीची रक्कम साडेसहा कोटीपर्यंत पोचली आहे. ग्राहकांच्या घराघरात जावून बिले भरण्याचे आवाहन केले जात आहे. त्याला प्रतिसाद न देणार्या 500 ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्यात आल्या आहेत.
-सचिन येरेकर, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, मुरूड