पनवेल : रामप्रहर वृत्त
गव्हाण विद्यालयाने एचएससी व एसएससी अर्थात दहावी आणि बारावीच्या बोर्डा परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करून विद्यालयाच्या उज्वल यशाची परंपरा राखली. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणार्या विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत यांचे अध्यक्षतेखाली गुणगौरव करण्यात आला.
विद्यालयाचा यंदा बारावीचा निकाल 98.57 टक्के तर दहावीचा बोर्ड परीक्षेचा निकाल 98.85 टक्के लागला. इयत्ता बारावी वाणिज्य शाखा आणि इयत्ता दहावीच्या गुरुकुल व सेमी माध्यमाचा निकाल 100 टक्के लागला. इयत्ता बारावीचे यशस्वी विद्यार्थी प्रज्ञा राजेंद्र चौधरी (विद्यालयात प्रथम), रिद्धी सुभाष कडू (द्वितीय), आकांक्षा ज्ञानेश्वर म्हात्रे (विद्यालयात तृतीय व वाणिज्य शाखेत प्रथम), कुंता नवनाथ काकडे (कला शाखेत तृतीय), रक्षा एकनाथ कोळी (वाणिज्य शाखेत द्वितीय), सायली मदन पाटील (वाणिज्य शाखेत तृतीय) तसेच इयत्ता दहावीच्या परीक्षेत शशीकांत विलास चौगुले (प्रथम), सानिया अलिम अन्सारी व सिद्धी मंगल घरत (द्वितीय -विभागून) आणि प्रणिता मोहन भोसले (तृतीय) या सर्व विद्यार्थ्यां सोबतच त्यांच्या पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प, भेटवस्तू आणि मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.
विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी व समन्वय समिती सदस्य अरुणशेठ भगत यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या गुणगौरव सोहळ्यास ज्येष्ठ नेते वसंत पाटील, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंता ठाकूर व विश्वनाथ कोळी, ज्येष्ठ नेते जयवंत देशमुख, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय सदस्य समिती सदस्य प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, रयत शिक्षण संस्थेच्या लाईफवर्कर ज्योत्स्ना ठाकूर, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे तसेच इयत्ता दहावीचे वर्ग शिक्षक चित्रा पाटील, सागर रंधवे व संदीप भोईर आणि इयत्ता बारावीचे वर्ग शिक्षक प्रा. माणिकराव घरत व प्रा. उमेश पाटील तसेच पालक आणि शिक्षक उपस्थित होते.
विद्यालयाच्या आधारस्तंभ व रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब हे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना भरघोस पारितोषिके देत असतात. तसेच अरुणशेठ भगत यांनीही विद्यार्थी पारितोषिकांसाठी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ 50 हजार रुपयांचा निधी अनामत रक्कम ठेवली आहे.
ज्येष्ठ नेते वसंत पाटील यांजकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिकांसाठी एक लाख रूपयांचा धनादेश अनामत रक्कम ठेवण्याची घोषणा अरुणशेठ भगत यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली.
गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून प्रज्ञा राजेंद्र चौधरी (बारावीत प्रथम) व सिद्धी मंगल घरत (दहावीत द्वितीय) या विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सागरकुमार रंधवे यांनी केले.