26 लाखांच्या सतरंज्या जळून खाक
माणगाव : प्रतिनिधी
दिघी-पुणे राज्यमार्गावर माणगावजवळ गुरुवारी (दि. 18) चालत्या आयशर टेम्पोने अचानक पेट घेतल्याने टेम्पोतील सुमारे 26लाख रुपयांच्या सतरंज्या जळून खाक झाल्या.
नागपूर येथून सतरंज्या घेवून निशाण कार्गो ट्रान्सपोर्टचा आयशर टेम्पो (एमएच-12, एचडी-4448) म्हसळा, श्रीवर्धनकडे येत होता. तो गुरुवारी सकाळी माणगाव परिसरातील दिघी-पुणे राज्यमार्गावरील एस. आर. पेट्रोल पंपाच्या पुढे गेल्यावर हा टेम्पो पाठीमागून पेटत असल्याचे एका दुचाकीस्वारांच्या लक्षात आले.त्यांनी लगेचच टेम्पो चालकाला त्याची दिली. टेम्पो चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा करून तो तेथून पळून गेला. या टेम्पोत बसलेले टेम्पोचे मालक प्रकाश ढगे व त्यांचा मुलगा सुखरूपपणे टेम्पोतून बाहेर पडले. महाड नगर परिषदच्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक ग्रामस्थांनी ही आग नियंत्रणात आणली. या घटनेत टेम्पोतील सतरंज्या जळून खाक झाल्या. तसेच वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
टेम्पो मालक प्रकाश ढगे (रा. दहिसर मोरी, जि. ठाणे) यांनी दिलेल्या माहितीवरून या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.