जाकार्ता : वृत्तसंस्था
भारताची स्टार टेनिसपटू पी. व्ही. सिंधू हिचे इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविण्याचे स्वप्न भंगले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला. यामागुचीने सिंधूचा 15-21, 16-21 असा पराभव केला. सिंधूने हा मुकाबला अवघ्या 51 मिनिटांमध्ये गमावला. मुकाबल्याच्या सुरुवातीला सिंधूने आक्रमकपणा दाखवत लढतीवर आपली हुकूमत राखली, मात्र नंतर ती यामागुचीच्या स्मॅशना उत्तर देऊ शकली नाही. यामागुचीने फोरहँड स्मॅशद्वारे ही लढत आपल्या बाजूने वळवली. सिंधूने काही चुकाही केल्या, शिवाय आघाडी मिळवण्याच्या अनेक संधीही गमावल्या. आपल्या आक्रमक खेळाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचून पुन्हा एकदा सिंधूच्या हातून हा विजय निसटला.