श्रीवर्धन : प्रतिनिधी
दोन कर्मचारी बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने श्रीवर्धनमधील मध्यवर्ती प्रशासकीय भवन गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीवर्धनमधील मध्यवर्ती प्रशासकीय भवन या इमारतीमध्ये तहसील, प्रांत, तलाठी, मंडळ अधिकारी त्याचप्रमाणे उपनिबंधक (दस्त नोंदणी) आदी कार्यालये आहेत. याच इमारतीत काम करणारे दोन कर्मचारी बुधवारी कोरोना बाधित आढळल्यामुळे गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांसाठी मध्यवर्ती प्रशासकीय भवन बंद राहणार आहे.
नागोठण्यातही सापडला कोरोनाचा नवीन रुग्ण
नागोठणे : प्रतिनिधी
शहर परिसरात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला असल्याने गतवर्षीप्रमाणे महामारीस पुन्हा सुरुवात तर होणार नाही ना, या भीतीने नागोठण्यातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात एका कोरोना सक्रीय रुग्णाची नोंद झाली असल्याच्या वृत्ताला तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांनी दुजोरा दिला. मात्र, संबंधित व्यक्तीने त्याचा पत्ता नागोठणे असा दिला असला तरी ती व्यक्ती नागोठणे शहराबाहेर राहात असून येथील रिलायन्स कंपनीत किंवा तेथील ठेकेदार कंपनीत काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या कोरोनाबाधित रुग्णाची कोविड सेंटरमध्ये रवानगी केली असल्याचे डॉ. म्हात्रे यांनी सांगितले.
माणगावात कोरोना वाढतोय
माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असून गेल्या काही दिवसांपासून दररोज दोन, तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येकडे गांभीर्याने पाहून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन माणगावच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी केले आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी नियम व अटीशर्ती घालून देऊन मार्गदर्शन केले.
आता लसदेखील उपलब्ध केली आहे. त्यामुळे ही महामारी आटोक्यात आली होती. मात्र आता या महामारीची दुसरी लाट आली आहे. माणगाव तालुक्यात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी तालुक्यातील जनतेने शासन निर्बंधांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे प्रशाली जाधव दिघावकर यांनी सांगितले.