Breaking News

थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी सिडकोची अभय योजना जाहीर

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळातर्फे 51व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील सिडको अधिकार क्षेत्रातील थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी संबंधित अनुज्ञप्तीधारक/पट्टेदार, बांधकामधारक, सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्याकरिता अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. ही अभय योजना वर्तमानपत्रात प्रसिद्ध होण्याच्या तारखेपासून पुढील एक वर्षाच्या कालावधीकरिता सिडको कार्यक्षेत्रात वैध असणार आहे. या कालावधीत सेवा शुल्क भरणार्‍यांना विलंब शुल्कामध्ये सूट देण्यात येणार आहे.  ज्या अनुज्ञप्तीधारक/पट्टेदारांचे विलंब शुल्क वगळता सेवा शुल्क हे एक कोटी रुपयांहून अधिक नाही अशांकरिताच ही अभय योजना लागू असणार आहे. अभय योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत सेवा शुल्क भरणार्‍या अनुज्ञप्ती/भाडेपट्टाधारकांचे 75 टक्के विलंब शुल्क माफ करण्यात येईल. अभय योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर परंतु 12 महिन्यांच्या आत सेवा शुल्क भरणार्‍या अनुज्ञप्तीधारक/पट्टेदारांना विलंब शुल्कामध्ये 50 टक्के सूट देण्यात येईल. सिडको महामंडळ सिडको अधिकार क्षेत्रात रस्ते, मलनि:सारण व्यवस्था, पुराचे पाणी वाहून नेण्यासाठी व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया संयंत्रे, घन कचरा व्यवस्थापन यंत्रणा, पथदिवे इ. नागरी सुविधा पुरविण्याचे आणि त्यांची देखभाल करण्याचे काम करीत आहे. या सुविधांच्या बदल्यात सिडकोकडून भूखंडांचे अनुज्ञप्तीधारक अथवा पट्टेदार, सहकारी गृहनिर्माण संस्था, बांधकामधारक यांच्याकडून दर तीन महिन्यांनी सेवा शुल्क आकारले जाते. सेवा शुल्काच्या वसुलीसाठी भाडेपट्टा करारनामा तसेच भाडेपट्टा विलेखामध्ये अनुज्ञप्तीधारक अथवा पट्टेदार यांनी प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे 1 एप्रिलला सेवा शुल्क आगाऊ भरावे, असे नमूद आहे. तसेच महामंडळाकडून सेवा शुल्काच्या वसुलीसाठी दर महिन्याला देयके पाठवली जातात. अनेक प्रकारे प्रयत्न करूनही अनेक अनुज्ञप्तीधारक अथवा पट्टेदार हे सेवा शुल्क न भरणारे कसूरदार असल्याचे आढळून आले आहे. करोनामुळे जाहीर करण्यात टाळेबंदीमुळे बहुतांश अनुज्ञप्तीदार अथवा पट्टेदार यांना सेवा शुल्काचा भरणा करणे कठीण झाले होते. अशा सर्व बाबींचा विचार केला असता भाडेपट्टा करारनामा अथवा भाडेपट्टा विलेखाचा भंग नियमितीकरण करण्यासाठी महामंडळाने विलंब शुल्कावर विशिष्ट सवलत देत सेवा शुल्क वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभय योजना भविष्यात अनुज्ञप्तीधारकांना सेवा शुल्क न भरण्याचे नियमितीकरण करण्याचा कोणताही हक्क प्रदान करत नाही. लागू होणार्‍या विलंब शुल्कासह संपूर्ण थकीत सेवा शुल्क भरणार्‍या अनुज्ञप्तीधार अथवा भाडेपट्टाधारकांकरिताच ही अभय योजना लागू होणार आहे. सिडको महामंडळ सर्व अनुज्ञप्तीदार अथवा पट्टेदार, विकासक, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना ह्या विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करत आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply