Sunday , October 1 2023
Breaking News

रोहा भास्तेकरवाडीत मसाला पिके लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण

रोहे ः प्रतिनिधी : शासनाच्या एकात्मिक फलोद्यान विकास अभियान अंतर्गत कोकणातील मसाला पिकांचे लागवड क्षेत्र वाढविणे व प्रक्रिया व्यवसायास चालना देण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्रामार्फत भोस्तेकरवाडी (ता. रोहे) येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यास घोसाळे परिसरातील 120 शेतकरी, महिला व युवक उपस्थित होते.

किल्ला रोहे येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांच्या या हस्ते प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कृषी विस्तार तज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर यांनी कोकणातील मसाला पीक उत्पादनात असलेला वाव व सद्यस्थिती याविषयी विवेचन करून रोहा तालुक्यातील नारळ, सुपारी बागांमध्ये किंवा परसबागेत मसाला पिकांची लागवड करण्यात असलेला वाव याबाबत माहिती दिली. उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. राजेश मांजरेकर यांनी काळीमिरी, दालचिनी व जायफळ लागवडीविषयी माहिती देऊन घरगुती वापराइतके मसाला उत्पादन कसे करता येईल, हे सांगितले. संशोधन सहाय्यक ललित खापरे यांनी कोकम लागवड व हळद लागवड, तसेच प्रक्रिया याविषयी माहिती दिली. मसाला पिकातील किडी व रोग याविषयी वनस्पती रोग तज्ज्ञ जीवन आरेकर यांनी माहिती दिली.

अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. मनोज पाटील यांनी नारळ व सुपारी बागेत मसाला पिकांची आंतरपीक म्हणून लागवड व त्याचे अर्थशास्त्र समजावून सांगितले, तसेच भविष्यात हळद, काळीमिरी रोपांचा शेतकर्‍यांना गरजेनुसार पुरवठा केला जाईल, असे नमूद केले. यानंतर उपस्थित शेतकर्‍यांना प्रतिनिधिक स्वरूपात काळीमिरी रोपांचे वाटप शास्त्रज्ञाच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी मसाल्याच्या 10 पिकांपासून उत्पादित पदार्थांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते, तसेच घोसाळे गावातील महिला बचत गटाने मसाला पदार्थ विक्रीकरिता उपलब्ध केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विवेकानंद संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे प्रसाद दगडे, रूळेकर व त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply