Breaking News

सुधागडात होळीतील हजारो पोळ्या आदिवासींच्या मुखी

पाली ः प्रतिनिधी
सण-उत्सव साजरे करताना सेवाभाव व सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश ‘अंनिस’ने आपल्या कृतीतून दिला आहे. सुधागडात होळीत जाणार्‍या शेकडो पोळ्या आदिवासी गोरगरिबांच्या मुखी घालण्याचे काम या ठिकाणी करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यंदाही ’होळी करू लहान, पोळी करू दान’ असे आवाहन एक संघर्ष समाजसेवेसाठी व महाराष्ट्र अंनिसने केले होते. त्यानुसार पालीतील एक संघर्ष समाज सेवेसाठी ग्रुप व महा. अंनिस पाली-सुधागड शाखेच्या वतीने जवळपास एक हजाराहून अधिक पोळ्या संकलित केल्या. या पोळ्या, पापड व फेण्या आदिवासी वाड्या-पाड्यांवर आणि गरीब वस्त्यांवर वाटून आदिवासी व गरिबांची होळी गोड करण्यात आली.
बुरूमाळी येथील ग्रामस्थांनीदेखील पोळ्या जमा करून त्यांचे वाटप केले. ’होळी करू लहान, पोळी करू दान’ या कार्यक्रमाच्या पाठीमागेसुद्धा राष्ट्रीय संपत्तीचे होणारे नुकसान टाळणे व पर्यावरणाचे प्रदूषण थांबविणे हा उद्देश आहे. हा उद्देश सफल करण्यासाठी हा उपक्रम राबिवला गेला, तोदेखील अगदी नियमितपणे. तरुणांनी रविवारी होळीच्या रात्री पालीतील सर्व होळ्यांवर जाऊन कागदी खोके वाटले. त्यामध्ये लोकांनी व्यवस्थितरीत्या पोळ्या संकलित करून ठेवल्या.
ठिकठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून पुढे येऊन पोळ्या आणून दिल्या. त्यामुळे होळीत जाणार्‍या शेकडो पोळ्या गोरगरिबांच्या मुखी लागल्या. तालुक्यातील दापोडे, तळई आदी आदिवासी वाड्यांवर तसेच टेंबी वसाहत येथे पोळ्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी भास्कर दुर्गे, संदेश सोनकर, शशिकांत पाशीलकर, किशोर चौधरी, पाली अंनिस शाखेचे अमित निंबाळकर, रोशन रुईकर, केतन निंबाळकर आदी सहभागी झाले होते.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply