पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दैनंदिन कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. संशयित रुग्णांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या अहवाल अलिबाग येथील शासकीय लॅबमध्येमधून येण्यास उशीर होतो. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाद्वारे दैनंदिन 500 कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या आता जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करण्यात येणार आहेत. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णासांठी याचा मोठा फायदा होणार आहे. वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता येथून पुढे उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणीचे 200 नमुने हे अलिबाग येथील शासकिय लॅबमध्ये पाठविण्यात येतील, तर उर्वरीत नमुना चाचण्या या जे. जे. रुग्णालय, मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. या चाचण्याचे अहवालही लवकर मिळणार असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही. तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. त्यामुळे रूग्णवाढीवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. पनवेल क्षेत्रात आरटी-पीसीआर चाचण्यासाठी लॅब सुरू करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. महापालिका प्रशासन कोरोनाच्या रुग्ण वाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्याशी संपर्क साधून पनवेल क्षेत्रातील कोरोनाच्या आरटीपीसीआर चाचण्या जे. जे. हॉस्पिटल येथे करण्याची परवानगी महापालिका प्रशासनाने मागितली होती. तसेच पालिकेचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी जे. जे. हॉस्पिटल येथील मायक्रोबायोलॉजीस्ट डॉ. जोशी यांच्याशी समन्वय साधून कोरोना आरटीपीसीआर चाचण्या करण्याविषयी पाठपुरावा केला. अखेरीस पनवेल महानगरपालिकेची ही मागणी मान्य करीत पनवेल क्षेत्रातील सहाही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरटी-पीसीआर चाचण्या करण्यासाठी जे. जे. हॉस्पिटलने संमती दिली आहे.