
‘देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे’ या कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या काव्यपंक्तीमध्ये उल्लेखलेले हात हे फक्त एखाद्या शिक्षकाचेच असू शकतात. तशी निर्मिती एखादा शिल्पकार, चित्रकार किंवा इतरही अनेक कलावंत करतात व त्यांच्या हातांना देखील निर्मितीच्या कळा सोसाव्या लागतात. परंतु शिक्षक जे निर्माण करतो, त्याला तोड नसते. म्हणूनच ‘शिक्षक दिन’ साजरा केला जातो.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने गावोगावच्या शाळांमध्ये आणि छोट्या-मोठ्या शिक्षणसंस्थांमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. शिक्षक हा समाजाचा कसा आत्यंतिक महत्त्वाचा घटक आहे याचे गोडवे गायले जातात. प्रसंगाला अनुरूप अशी भाषणे होतात आणि हार-तुर्यांची देवाणघेवाण होते. एवढे झाले की शिक्षक दिनाचा सोहळा पूर्ण होतो. हा एक दिवस मावळला की शिक्षकांच्या गौरवासाठी पुढे वर्षभर थांबावे लागते. वास्तविक, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे ही राष्ट्राच्या उभारणीमध्ये सक्रिय असलेली मंडळी पेशाने शिक्षकच होती. आपले पूज्य साने गुरूजी तर सार्यांचेच गुरूजी होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याला आता 73 वर्षे लोटली आहेत. स्वातंत्र्यलढ्यामध्ये शिक्षक पेशाच्या राष्ट्रपुरुषांनी सक्रिय भूमिका बजावली आणि पुढे एक समर्थ आणि स्वतंत्र भारतीय समाज उभा करण्याच्या दृष्टीने आपले तन, मन, धन वेचले. त्यांच्या परिश्रमाची फळे आजदेखील आपण चाखत आहोत. परंतु काळाच्या ओघात शिक्षणाचा बाज बदलला. त्याचबरोबर शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा आणि मूल्य देखील घसरले. अर्थात आज देखील काही ठिकाणी निरलसपणे विद्यार्जनाचे काम हाती घेतलेले अलौकिक शिक्षक दिसतात. त्यांच्या कामाची थोड्याफार प्रमाणात का होईना दखल घेतली जाते. शिक्षकाचा पेशा हा काही चरितार्थापुरता मर्यादित राहात नाही. ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ या समर्थ रामदासांच्या शिकवणीनुसार काही शिक्षक चालतात. पुढील पिढ्यांना शहाणे करून सोडण्याची उर्मी या शिक्षकांना मोठे करते. अर्थात शिक्षणाचे व्रत घेतलेली अशी उजेडाची बेटे विरळाच असतात. लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर हे त्याचे एक ठळक उदाहरण मानायला हवे. विद्यादानाच्या पुण्यकर्मात त्यांनी आपले आयुष्य वेचले. दुर्दैवाने असे काही मोजके अपवाद वगळल्यास एकंदर परिस्थिती फारशी आशादायक नाही. शिक्षणाचा प्रचंड बाजार भरल्याचे चित्र सभोवती दिसते आहे. राष्ट्राच्या उभारणीत सक्रिय सहभाग घेणारा शिक्षकवर्ग आज कुठेतरी कोपर्यात उभा दिसतो. हाताखालच्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना ज्ञान द्यायचे कार्य दूरच राहून परीक्षेत उत्तरे कशी लिहावीत याचे निव्वळ तंत्र शिकवण्यात आपली शिक्षणव्यवस्था खर्ची पडते आहे. यामुळेच गावोगाव आणि शहरोशहरी कोचिंग क्लासेसचे पेव फुटलेले दिसते. खरेखुरे शिक्षण विद्यार्थ्यांच्या हाती आणि मस्तकी पोहचणे सध्याच्या काळात कठीण होऊन बसले आहे. हे अर्थातच या परीक्षा-तंत्र प्रशिक्षणाच्या बाजारामुळेच. विद्यार्थ्याचा बौद्धिक कल आणि कुवत ओळखून त्याला कौशल्याधारित शिक्षण देणारी व्यवस्था आपल्याकडे अस्तित्वातच नव्हती. भारतीय शिक्षणव्यवस्थेचा हा जुना आजार ओळखून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारताचे नवे शिक्षण धोरण जाहीर केले. गेल्या काही दशकांमध्ये देशाच्या शिक्षण व्यवस्थेची झालेली पडझड यामुळे थांबेल आणि नव्या भारताच्या पुनउभारणीसाठी नव्या पिढ्या घडवणारी नवी शिक्षणव्यवस्था अंमलात येईल अशी आशा करूया.