Breaking News

राज्यातील जनतेला वार्यावर सोडलेय; भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा ठाकरे सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी

कोरोना लसीच्या कमतरतेवरून राज्य सरकार केंद्रावर करत असलेल्या आरोपांवरून ठाकरे सरकारवर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, राज्य सरकारने राज्यातील जनतेला वार्‍यावर सोडलेय, फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा टोला ही त्यांनी लगावला आहे. राधाकृष्ण विखे-पाटील एका वृत्तवाहिनीशी बोलताना ठाकरे सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ठाकरे सरकारने मंत्र्यांना सध्या मुख्यमंत्र्यांनी एकच काम दिलेय. केंद्रावर आरोप करा व आपले पाप झाका, ठाकरे सरकार एवढेच करताना दिसत आहे. राज्यातील जनतेला वार्‍यावर सोडल्याची भावना आहे. फक्त फेसबुकवर संवाद साधून तुम्ही जनतेचे समाधान करू शकणार नाही, असा चिमटा राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काढला आहे. नगर जिल्ह्यात 4 मंत्री आहेत. इथले पालकमंत्री पाहुण्यासारखे येतात. त्यांच्या स्वत:च्या तालुक्यात ते एकही कोविड रुग्णालय सुरू करू शकलेले नाहीत, असा खोचक टोला हसन मुश्रीफ यांना लगावत सगळी मदार खासगी रुग्णालयांच्या भरवश्यावर सोडली आहे. जिल्ह्यातील सर्व मंत्री करतात काय, असा संतप्त सवाल भाजप नेते विखे-पाटील यांनी केला आहे.

नियोजनशून्य कारभार

केंद्रावर बोट दाखवण्यापेक्षा रेमडेसिवीर, ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे नियोजन राज्य सरकार करू शकले नाही. सरकारचा नियोजनशून्य कारभार झाकण्यासाठी किंवा लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे, अशा शब्दांत विखे-पाटील यांनी टीका केली.

‘अपयश झाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरताहेत’

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाच्या लसींच्या कमी पुरवठ्यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. यावरून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत. कोरोना लसीचा महाराष्ट्राला कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याचे सांगून केंद्रावर टीका करणार्‍या राज्य सरकारला अतुल भातखळकर यांनी ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे, त्यात ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये लसी आहे, पण लसी देण्याची ऑर्डर नाही आहे. ठाकरे सरकारने आता कोरोना काळातील प्रचंड अपयश झाकण्यासाठी नागरिकांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे, किती हा बेशरमपणा? असा टोला लगावला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी कोरोना लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या असून, राज्याला पुरेसे लसीचे डोस मिळावेत, अशी मागणी राज्य सरकारकडून वारंवार केली जात आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून पुरेसे लसीचे डोस दिले जात असल्याचा दावा केला जात आहे.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply