Breaking News

आधी भूमिपुत्रांचे पैसे द्या, मगच मत मागा!

महेश बालदी यांचा घणाघात; जासईत शक्तिप्रदर्शन

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर

स्वतःला भूमिपुत्रांचे कैवारी म्हणवून घेताना शेकापच्या विवेक पाटलांनी कर्नाळा बँकेत 400 कोटींचा घोटाळा करून गोरगरीब जनतेला कंगाल केले आहे. तुम्हाला भूमिपुत्र जनतेकडून मत हवे असेल, तर प्रथम त्यांचे पैसे परत करा; अन्यथा हीच जनता तुमची मस्ती उतरविल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांनी केला. उरण विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या बालदी यांनी शुक्रवारी (दि. 4)

जासई दास्तान फाटा येथील शिवसमर्थ स्मारकाजवळ जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या वेळी विशाल जनसमुदायासमोर बोलताना त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

या सभेस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, खालापूर तालुका अध्यक्ष बापू घारे, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, उद्योजक पी. पी. खारपाटील आदी नेतेगण उपस्थित होते.

या वेळी महेश बालदी यांनी शेकापवर चौफेर टीकास्त्र सोडले. शेकाप पुढार्‍यांनी कधीच शेतकरी, कामगारांचा विचार न करता जनतेचा पैसा बँकांमार्फत गोळा करून आपली संपत्ती वाढविण्याचा उद्योग मात्र चोखपणे केला. आता त्यांना स्थानिक भूमिपुत्रांची आठवण होत आहे. याच स्थानिक भूमिपुत्रांचे कर्नाळा बँकेत घोटाळा करून 400 कोटी हडप करण्याचे पातक माजी आमदार विवेक पाटलांनी केले आहे. त्यांना जनतेकडे मत मागण्याचा अधिकार नसल्याचे बालदी म्हणाले.

शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर यांनी गेल्या पाच वर्षांत जनहिताचे कुठलेही काम केले नसून, भाजपने केलेल्या कामांचे श्रेय आमदार भोईर यांनी लाटल्याचा आरोप महेश बालदी यांनी केला. माझ्यावर परप्रांतीय म्हणून टीका करणार्‍या विरोधकांनी मी या उरणच्या मातीत वाढलेला खरा उरणकर असून, जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारा या जनतेचा पुत्र आहे, असे सांगून उरणच्या जिल्हा परिषद शाळेत माझे शिक्षण झाल्याने माझ्यावर टीका करणार्‍या विरोधकांनी मराठी भाषा, इतिहास, भूगोल जाणून घेण्यासाठी माझ्याबरोबर परीक्षेला बसावे, असे आव्हानही बालदी यांनी विरोधकांना दिले.

होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत विजय आपलाच असल्याचा विश्वास व्यक्त करून कार्यकर्त्यांनी 24 ऑक्टोबरला विजयाचा गुलाल उधळण्यास सज्ज राहावे, असे बालदी यांनी टाळ्यांच्या कडकडाटात सांगितले. उपस्थित प्रमुख मान्यवरांनी महेश बालदी यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

या सभेस भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रवीण खंडागळे, उरण शहराध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष सुधीर घरत, कामगार नेते सुरेश पाटील, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, भाजप युवा मोर्चा उरण तालुका अध्यक्ष शेखर तांडेल, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष संगीता पाटील, नीता महेश बालदी, केळवणे जिल्हा परिषद अध्यक्ष किरण माळी, पंचायत समिती गण अध्यक्ष हिरामण ठाकूर, पंचायत समिती सदस्य तनुजा टेंबे, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय टेंबे, प्रकाश ठाकूर, पंडित घरत, जितेंद्र घरत, ज्ञानेश्वर सुर्वे, जसखारचे सरपंच दामूशेठ घरत, सोनारीच्या सरपंच पूनम कडू, साईचे सरपंच विद्याधर मोकल, दिघाटीचे सरपंच अमित पाटील, माजी उपसरपंच दत्तात्रेय पाटील, तारा येथील माजी उपसरपंच विद्याधर जोशी, केळवण्याचे उपसरपंच भानुदास गावंड, गाव अध्यक्ष रामचंद्र मोकल, शिरढोणचे माजी उपसरपंच मंगेश वाकडीकर, नगरसेवक, नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply