भय घालवण्यासाठी वनविभागाचा पुढाकार
पाली : प्रतिनिधी
सुधागड तालुक्यातील पालीतील अंबा नदीमध्ये दुर्मिळ पानमांजरांचे वास्तव्य असल्याचे समोर आले आहे. पानमांजराचे वास्तव्य पर्यावरणासाठी बहुमूल्य असल्याने पर्यावरण प्रेमींमध्ये उत्साह संचारला आहे. प्रारंभी या पानमांजराविषयी ग्रामस्थांत भीती निर्माण झाली होती, मात्र वनविभागाने जनजागृती करून लोकांचं भय कमी केलंय.
पालीतील व्यापारी विजय घावटे यांना 5 ते 6 दिवसांपूर्वी अंबा नदीमध्ये पानमांजराचा समूह दिसला होता. त्यानंतर मंगळवारी (दि. 20) सायंकाळी वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी त्याठिकाणी भेट देवून खात्री केली. तालुक्यातील पर्यावरण निरीक्षक अमित निंबाळकर यांनीदेखील या घटनेमुळे आंनद व्यक्त केला आहे. पानमांजर दुर्मिळ असून त्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे असे निंबाळकर यांनी सांगितले.
पानमांजरांच्या वसाहती
भरपूर पाणी आणि जवळ लपण्याजोगी जागा असणारी सरोवरे, तलाव, नद्या, कालवे, दलदलीच्या जागा, खारफुटीची वने आणि दगडांच्या राशी असलेले नदीकिनारे या ठिकाणी पानमांजरांच्या वसाहती असतात. नर, मादी व पिले एकत्र वावरतात. शेपटीच्या बुडाशी असलेल्या ग्रंथीतून विशिष्ट गंध सोडून ते त्यांच्या अधिवासाच्या टापूची मालकी प्रस्थापित करतात.
पानमांजराचे खाद्य
मासे हे पानमांजराचे मुख्य अन्न आहे. याखेरीज उंदीर, पाणसाप, बेडूक तसेच छोटे पक्षीही ते खाते. पानमांजरे बर्याचदा गटाने माशांच्या थव्याचा पाठलाग करून त्यांना पकडतात. त्यांच्या विणीचा हंगाम सप्टेंबर-फेब्रुवारी महिन्यांत असतो. या हंगामात ते एका जागी स्थिरावतात व तात्पुरती घरे करतात. मादी एका वेळी 2-5 पिलांना जन्म देते. नर आयुष्यभर मादीशी एकनिष्ठ असतो. पिले दोन महिन्यानंतर स्वतंत्रपणे पोहू शकतात. पानमांजराचे आयुष्य 4 ते 10 वर्षे असते.
पानमांजराचे वर्णन
भारतात सामान्यपणे गुळगुळीत कातडीचे पानमांजर आढळते. त्याचे वजन 7 ते 11 कि.ग्रॅ. आणि पाठीवरील केस तोकडे व मऊ असतात. रंग पिवळट तपकिरी असून पोटाकडे तो फिकट करडा असतो. शरीर लांब व निमुळते असते. पायाची बोटे अपुर्या पडद्यांनी जोडलेली असून त्यांचा उपयोग सफाईदारपणे पोहण्यासाठी होतो. विशिष्ट स्नायूंच्या सहाय्याने नाक आणि कान बंद करून ते पाण्यात बुडी मारून भक्ष्य शोधते. पाण्यात बुडी मारल्यानंतर ते 3-4 मिनिटे पाण्याखाली राहू शकते. त्याला शिट्टी मारल्यासारखा आवाज काढता येतो. भारतात यूरेशियन पानमांजरे आणि लहान नखी पानमांजरेही आढळतात.
अंबा नदीमध्ये पानमांजराचे अस्तित्व असणे हे चांगल्या जैवविधतेचे लक्षण आहे. यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. मासेमारी करतांना त्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नागरिकांनीही पानमांजराबाबत कोणतीही भीती किंवा अंधश्रद्धा बाळगू नये.
-समीर शिंदे, वनक्षेत्रपाल, पाली, ता. सुधागड
अंबा नदीजवळ दोन तीनवेळा मला पानमांजर दिसले. यांना समूहात व पाण्याबाहेर आलेलेदेखील पाहिले आहे. याबाबत जनजागृती व संवर्धन झाले पाहिजे.
विजय घावटे, प्रत्यक्षदर्शी, पाली, ता. सुधागड