Breaking News

नाशिकमध्ये मृत्यूचे तांडव

ऑक्सिजन गळतीमुळे 24 रुग्ण दगावले

नाशिक ः प्रतिनिधी
राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून, परिस्थिती गंभीर असतानाच नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने 24 रुग्णांना बुधवारी (दि. 21) आपला जीव गमवावा लागला. या रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळच्या सुमारास ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व नादुरुस्त असल्याने त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी तंत्रज्ञ, कारागीर दाखल झाले. दुरुस्तीचे काम सुरू असताना नादुरुस्त असलेला व्हॉल्व पूर्णपणे तुटला. नवीन व्हॉल्व बसवून गळती थांबविण्यासाठी दोन तासांचा कालावधी लोटला. या दरम्यान हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठ्याचा दाब कमी होऊन व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण एका पाठोपाठ दगावण्यास सुरुवात झाली. या दुर्घटनेत तब्बल 24 रुग्ण दगावल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्णालयात हाहाकार उडाला. त्यानंतर उर्वरित अत्यवस्थ रुग्ण वाचविण्यासाठी धावपळ उडाली. कुणी ऑक्सिजन सिलिंडर घेत होते, तर कुणी स्ट्रेचरवर रुग्णांना बाहेर आणून रुग्णवाहिकेतून दुसर्‍या दवाखान्यांमध्ये नेण्याची कसरत करीत होते. दरम्यान, राज्य शासन आणि नाशिक मनपा यांच्याकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मृतांच्या वारसांना जाहीर करण्यात आली आहे.
मृतांच्या नातेवाइकांचा आक्रोश
झाकीर हुसेन रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेनंतर मृतांच्या नातेवाइकांनी आक्रोश केला. हृदयाला पिळवटून टाकणारे हे दृश्य रुग्णालयाच्या आवारात पाहायला मिळाले. गळतीच्या बेफिकिरीबाबत संताप व्यक्त होत असून, दोषींवर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी सर्वस्तरांतून केली जात आहे.
हृदय पिळवटून टाकणारी घटना ः पंतप्रधान मोदी
नाशिकमधील झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे. नाशिकमध्ये घडलेली घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या दुर्घटनेत लोकांना प्राण गमावावे लागल्याने मला प्रचंड दु:ख झाले आहे. या दु:खाच्या प्रसंगी माझ्या सद्भावना मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
घटनेची सखोल चौकशी करा -देवेंद्र फडणवीस
नाशिकमधील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेबाबत राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. ही घटना धक्कादायक आहे. याची कारणे काय आहेत ती समोर येतीलच, मात्र सद्यस्थितीत रुग्णालयातील इतर रुग्णांच्या मदतीसाठी प्राधान्य देण्यात यावे, गरज पडल्यास त्यांना इतरत्र हलवावे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे, तसेच या दुर्घटनेच्या सखोल चौकशीची मागणीही फडणवीस यांनी केली आहे.
दोषींवर तातडीने कारवाई करा -प्रवीण दरेकर
नाशिकमधील घटनेनंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन गळती दुर्दैवी असून, याबाबत आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले,’ असे दरेकर यांनी ट्विट करून म्हटले आहे.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply