24 तासांत दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
महाराष्ट्रासह देशात कोरोनाचा कहर वाढतच असून, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. देशभरात बुधवारी (दि. 21) सकाळी संपलेल्या 24 तासांत 2023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच दोन लाख 95 हजार 41 नवे रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण रुग्णसंख्या एक कोटी 56 लाख 16 हजार 130वर पोहचली आहे, तर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख 82 हजार 553 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 24 तासांत एक लाख 67 हजार 457 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एक कोटी 32 लाख 76 हजार 39 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तसेच 21 लाख 57 हजार 538 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असणार्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. महाराष्ट्रात मंगळवारी 62 हजार 97 रुग्णांची नोंद झाली, तर 24 तासांत सर्वाधिक म्हणजेच 519 मृत्यू झाले आहेत.