Breaking News

नवी मुंबईत रात्रीची स्वच्छता मोहीम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

निश्चय केला, नंबर पहिला हे ध्येय साध्य करण्यासाठी शहर स्वच्छतेबाबत जागरूक असणार्‍या नवी मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार दिवाळीत रात्री वाजविल्या जाणार्‍या फटाक्यांच्या मोठ्या प्रमाणावर होणार्‍या कचर्‍यामुळे सकाळी दैनंदिन स्वच्छतेवर वाढणारा ताण लक्षात घेत 4 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपुजनाच्या रात्रीपासून पहाटेपर्यंत यशस्वीपणे महास्वच्छता अभियान राबविले.

सकाळी लवकर जॉगींगसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांना रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके वाजल्यानंतरही पहाटे स्वच्छ रस्ते पाहून समाधान वाटले आणि अनेक जणांनी सोशल मिडियावर या विशेष मोहिमेची दखल घेत संदेश प्रसारण करीत कौतुक केले. दिवाळीच्या दिवसांमध्ये विशेषत्वाने लक्ष्मीपूजनाच्या व अभ्यंगस्नानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर फटाके वाजविले जातात. रात्री उशीरापर्यंत फटाके वाजविले जात असल्याने सकाळी मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होतो. याचा ताण दुसर्‍या दिवशीच्या स्वच्छता कार्यवाहीवर पडतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेत सर्व आठही विभागांमध्ये स्वच्छताकर्मींच्या समुहांची रात्रीच्या सफाईसाठी नेमणूक करण्यात आली.

स्वच्छतेची शपथ घेत रात्री 11 वाजता पालिकेच्या आठही विभागांमध्ये महास्वच्छता अभियानास सुरूवात करण्यात आली. पहाटे 4 वाजेपर्यंत 467 स्वच्छताकर्मींनी अथक मेहनत घेत रस्त्यांवर पडलेला फटाक्यांचा, फुलांचा असा 32 टन 450 किलो कचरा संकलित केला. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे व सर्व स्वच्छता अधिकारी, कर्मचारी संपूर्ण रात्रभर या कार्यवाहीवर लक्ष ठेवून होते. सकाळी स्वच्छ रस्ते पाहून नागरिकांनी या उपक्रमाची प्रशंसा करीत आनंद व्यक्त केला.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply