नवी मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने बहुतांश कामगारांनी गावचा रस्ता धरला, तर काही कामाच्या प्रतीक्षेत दररोज नाक्यावर गर्दी करताना दिसत आहेत. शासनाकडून बांधकाम व्यवसायाला परवानगी दिली असली तरी नवी मुंबई परिसरात काम मिळत नसल्याने नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नवी मुंबईत जवळपास तीन हजारांहून अधिक नाका कामगार आहेत.नवी मुंबई पालिका क्षेत्रात उदरनिर्वाह भागवण्यासाठी कामगारवर्ग दरवर्षी दाखल होतात. गतवर्षी संपूर्ण टाळेबंदी करण्यात आली होती. त्यामुळे कामगारांचे हाल झाले. यंदा बांधकाम क्षेत्रातील कामासाठी परवानगी दिली असली तरी काम मिळत नसल्याने हातावर पोट असणार्या नाका कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनामुळे दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी केली आहे. त्यामुळे कामगारवर्गावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी कामगारांना शासनाने मदतीचा हात दिला आहे, मात्र त्यातून नोंद असणार्या कामगारांनाच मदत मिळणार, परंतु नोंदच नसलेल्या कामगारांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नोंदणी नसलेल्या कामगारांची कामासाठी धडपड सुरूच आहे. त्यामुळे दररोज नाक्यावर कामासाठी कामगार गर्दी करीत आहेत. नवी मुंबईत बहुतांश कामगारांच्या नोंदीच शासन दरबारी नसल्याने आपल्या खात्यात शासनाचे दीड हजार येणार नसल्याची हुरहूर नाका कामगारांना लागली आहे. काहींना रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. नवी मुंबईत तुर्भे, वाशी, रबाळे, नोसिल नाका, वाशी नाका, सेजल गॅस नाका, नेरूळ आदी नाक्यांवर मोठ्या संख्येने कामगार कामाच्या प्रतीक्षेत उभे राहतात. परिणामी येथे त्यांच्याकडून सामाजिक अंतराचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहावयास मिळत आहे.
नाका कामगारांची खूपच बिकट अवस्था झाली असून त्यांच्या नोंदीदेखील शासनाकडे नाहीत. परिणामी ते शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे लवकरच कामगार आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्या नोंदी करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
-प्रदीप वाघमारे, नाका कामगार नेते
गेल्या वर्षीपासून टाळेबंदीची टांगती तलवार आमच्यावर आहे. हाताला काम नसल्याने किती दिवस उसनवारीवर घर चालवायचे, असा प्रश्न पडतो. हाताला काम नाही, पोटाला भाकर नाही. त्यात शासनाकडे आमच्या नोंदी नाहीत. त्यामुळे शासनाकडून मिळणारी मदतही आमच्या पदरी पडणार नाही.
-विनोदसिंग राठोड, नाका कामगार