मुंबई ः प्रतिनिधी
रेमडेसिविर इंजेक्शनच्या वेगवेगळ्या किमती आणि त्यावरून सुरू असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) याचिका दाखल केली आहे. राज्यात कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. कोरोनासाठी प्रभावी ठरलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आणि ऑक्सिजनच्या कमरतेमुळे रुग्णांच्या कुटुंबीयांची दमछाक झाली आहे. त्यातच राज्यात वेगवेगळ्या किमतींना रेमडेसिविर विकत घेण्याची ऑर्डर काढली आहे, मात्र रेमडेसिविर इंजेक्शनच्या वेगवेगळ्या किमती आणि सुरू असलेल्या भ्रष्टाचारप्रकरणी भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लोकायुक्त आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याचिका दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी याला ठाकरे सरकारचा कोविड भ्रष्टाचार असे म्हटले आहे. किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर हँडलच्या माध्यमातून एप्रिल 2021मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने रेमडेसिविर इंजेक्शन 1568 रुपयांना खरेदी करण्याची ऑर्डर काढली, तसेच राज्याच्या आरोग्य विभागाने 1311 रुपये, हाफकिन इन्स्टिट्यूटने 665.84 रुपये तर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने 665.84 रुपयांना विकत घेण्याची ऑर्डर काढली. मग या खरेदीच्या किमतीत इतकी तफावत असल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. नुकताच राज्यात कोविड काळात कोट्यवधींचा ऑक्सिजन घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. या ऑक्सिजन घोटाळ्याबाबत लवकरच काळी पत्रिका प्रसिद्ध करून राज्य सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढणार असल्याचा इशाराही सोमय्या यांनी दिला होता. कोरोना काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेने केलेल्या साहित्य खरेदीत 35 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपदेखील भाजपने केला होता.