Breaking News

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारा जेरबंद; गुन्हे शाखेची कारवाई

पनवेल ः वार्ताहर

सध्या देशभरात कोविडच्या उपचारासाठी लागणार्‍या रेमडेसिवीर या अत्यावश्यक इंजेक्शनचा तुटवडा असून, काही लोक त्याची चढ्या भावाने विक्री करीत आहेत. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार रेमडेसिवीरचा काळाबाजार करणार्‍या लॅब टेक्निशियनला गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. काही जण रेमडेसिवीरचा काळाबाजार करीत असल्याने त्यांच्यावर कारवाईबाबत पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. शेखर पाटील व पोलीस उपायुक्त गुन्हे प्रवीण पाटील यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)चे पोलीस उपनिरीक्षक वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहितीनुसार खांदा कॉलनी येथील खानदेश हॉटेलसमोर एक इसम रेमडेसिवीर इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी गुन्हे शाखा कक्ष-2 (पनवेल)चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे, सपोनि प्रवीण फडतरे, हवालदार अनिल पाटील, साळुंखे, रूपेश पाटील, सचिन पवार, सुनील कुदळे, सूर्यवंशी, सचिन म्हात्रे यांनी सापळा लावून  राहुल देवराव कानडे (38, रा. कळंबोली) या लॅब टेक्निशियनला ताब्यात घेतले.  त्याच्याकडे हेट्रो, सिपला, रेमविन या कंपनीची प्रत्येकी एक अशी एकूण तीन इंजेक्शन्स आढळली. या कारवाईकामी अन्न व औषध प्रशासन रायगडचे सहाय्यक आयुक्त गिरीश हुकरे तसेच औषध निरीक्षक मंजीतसिंग राजपाल यांचे सहकार्य घेऊन खांदेश्वर पोलीस ठाणे येथे भा. दं. वि. कलम 420सह औषध किंमत नियंत्रण आदेश 2003 परिच्छेद 26सह जीवनावश्यक वस्तूंचे अधिनियम 1955चे वाचन कलम 3 (2) (सी) दंडनीय कलम 7 (1) (ए) (2)सह औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियमामधील कलम 18 (ब)चे दंडनीय 27 (बी), 18-एचे दंडनीय 28प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply