Breaking News

देशाच्या मदतीला दिग्गज धावले!; मायक्रोसॉफ्ट, गुगलच्या सीईओंकडून मदतीची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

कोरोनाच्या पहिल्या लाटेत अवघ्या जगाच्या मदतीला धावून जाणार्‍या भारताला कोरोनाने दुसर्‍या लाटेने घेरले आहे. अशा वेळी अमेरिकेच्या दोन बड्या कंपन्या, ज्यांचे सीईओ भारतीय आहेत त्यांनी मोठी मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्ट आणि गुगलने या मदतीची घोषणा केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी अत्यंत दु:खी असल्याचे म्हटले आहे, तसेच कंपनीची सारी ताकद भारतासाठी लावणार असल्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे जगातील सर्वांत मोठे सर्च इंजीन गुगलने आणि त्यांच्या कर्मचार्‍यांनी भारताच्या मदतनिधीमध्ये 135 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी भारतातील कोरोना परिस्थिती पाहून आपले हृदय दुखावले असल्याचे म्हटले आहे. भारतात दिवसाला लाखो कोरोना रुग्ण आढळू लागले आहेत. आपली कंपनी भारतीयांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आपले तंत्रज्ञान आणि ऑक्सिजन यंत्रणा खरेदीसाठी मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अमेरिकेचीच आणखी एक कंपनी गुगल आणि अल्फाबेटचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांनीदेखील युनिसेफच्या भारतासाठीच्या मदतीच्या फंडामध्ये आपली कंपनी 135 कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली, तसेच भारताला फायदा न घेता वैद्यकीय मदत आणि कोरोना प्रसार रोखण्याची सर्व माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत भारतामध्ये विक्रमी संख्येने रुग्ण आढळून आल्यानंतर जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, सौदी अरेबिया यांसारख्या अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील आश्वासन दिले आहे. मागील अनेक आठवड्यांपासून भारतामधील लस निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी अडवणूक करणार्‍या अमेरिकेनेही भारतास सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. ब्रिटननेही भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईत सोबत असल्याचे आणि शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन भारतातील उच्चायुक्तांच्या माध्यमातून दिले आहे. जगभरातील 10 लहान मोठ्या देशांनी भारताला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply