Breaking News

पनवेलमध्ये 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

आठवडाभरात 4202 जणांनी घेतला डोस

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये दिनांक 1 मे ते 8 मे या आठवड्यामध्ये 4202 इतक्या नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळालेला आहे. हे लसीकरण वय वर्ष 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांना केले असून महानगरपालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1, 3 आणि 5 या तीन केंद्रामध्ये करण्यात आलेले आहे. रविवारी (दि. 9) सुटी असल्यामुळे लसीकरण केंद्रात लसीकरण झाले नाही.

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून राज्यात 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणास सुरुवात झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना तसेच इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना प्रचंड त्रास झाला त्यामुळे लस उपलब्ध झाल्यानंतर सर्वप्रथम ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले, तथापि कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत मात्र कोरोनाची दाहकता तरुण वर्गालादेखील जाणवू लागली. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठांबरोबरच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचेदेखील लसीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत आहे. शासनाच्या निर्देशानुसार दिनांक 1 मे 2021 पासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये 3 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रावर 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले.

पनवेल महानगरपालिका आरोग्य विभागात कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या मर्यादित मात्रा 1 मे रोजी दुपारी 1 वाजता प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे तत्काळ नियोजन करण्यात आले होते.

नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 1 पनवेल, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 3 नवीन पनवेल आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 5 खारघर या महापालिकेच्या तीन लसीकरण केंद्रांवर केवळ 18 ते 44 या वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. ज्या पात्र व्यक्ती केवळ कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून त्यानुसार आपली अपॉइंटमेंट निश्चित करतील, अशा व्यक्तींनाच त्या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे.

या लसीकरणासाठी महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागातून लसीकरण सेशन प्रसिद्ध केले जातात. तथापि आज अखेरच्या अनुभवावरून असे निदर्शनास आले आहे की, लसीकरण सेशन प्रसिद्ध केल्यानंतर काही मिनिटातच सर्व अपॉइंटमेंट निश्चित होतात. सुरुवातीला हे लसीकरण सेशन सायंकाळी 8 वाजता प्रसिद्ध केले जात होते, परंतु 4 मेपासून हे लसीकरण सेशन सायंकाळी 6 वाजता प्रसिद्ध केले जात आहे, तसेच केवळ ऑनलाइन अपॉइंटमट घेतलेल्या व्यक्तींनाच लसीकरण केले जाणार असल्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

सध्या 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी  ही लस उपलब्ध करून दिली असून प्रत्येक केंद्रावर 200 व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. जोपर्यंत पुरविण्यात आलेला साठा उपलब्ध आहे तोपर्यंत हे लसीकरण चालू राहील. भविष्यात जसा लसींचा साठा उपलब्ध होईल त्या प्रमाणात दररोज सेशन निर्माण करणे किंवा केंद्र संख्येमध्ये वाढ किंवा घट करणे याबाबत कार्यवाही केली जाईल. त्यामुळे लसीकरणाची अपॉइंटमेंट निश्चित करण्यासाठी कोविन किंवा आरोग्य सेतू अ‍ॅपवर नोंदणी करून सायंकाळी 6 वाजता अपॉइंटमेंट निश्चित करून घेण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन पनवेल महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पनवेल महापालिकेत तीन लसीकरण केंद्र असून दररोज लसीकरणासाठी साधारण 600 इतके रजिस्ट्रेशन होत आहे. सध्या लसींचा साठा मर्यादित उपलब्ध आहे, परंतु ज्याप्रमाणे अधिक लसींचा साठा उपलब्ध होईल. त्याप्रमाणे लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून लसीकरणास गती येईल आणि अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करता येईल. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी लसीकरण केंद्र वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या दृष्टिकोनातून गरज भासल्यास पुरेसे मनुष्यबळ वाढवण्याचीदेखील तयारी आहे, परंतु त्यासाठी लसींचा साठा उपलब्ध होणे आवश्यक आहे. ज्या पात्र व्यक्ती केवळ कोविन अ‍ॅपवर नोंदणी करून त्यानुसार आपली अपॉइंटमेंट निश्चित करतील, अशा व्यक्तींना त्या वेळेत लसीकरण करण्यात येत आहे.

-डॉ. मनीषा चांडक, नोडल अधिकारी, लसीकरण विभाग

आतापर्यंत  झालेले लसीकरण

दिनांक   लसीकरण

1 मे         257

2 मे         541

3 मे         557

4 मे         563

5 मे         569

6 मे         583

7 मे         564

8 मे  568

एकूण  4202

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply