Breaking News

रायगडात वृक्ष लागवड अभियानाचा शुभारंभ

अलिबाग : जिमाका – शासनाच्या हरित महाराष्ट्र चळवळी अंतर्गत अलिबाग तालुक्यातील वावे गावाच्या परिसरात सोमवारी (दि. 1) जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन, रायगड जिल्ह्यातील वृक्ष लागवड अभियानास सुरुवात करण्यात आली. लावलेले झाड हे माझे आहे, या भावनेने त्याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था यांच्या मार्फत वृक्ष लागवड करण्यात येत असून, सोमवारी सकाळपासूनच या कार्यक्रमास सर्व यंत्राणांमार्फत सुरुवात झाली असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिली.

भक्तीगीत व गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी उपवनसरंक्षक अलिबाग मनिष  कुमार, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, अलिबाग उपविभागीय अधिकारी  शारदा पोवार आदींनी वृक्ष लागवड करुन या कार्यक्रमात सहभाग घेतला. अलिबागचे तहसिलदार सचिन शेजळ, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी ए. एस. निकत  यांच्यासह  विविध

शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच वावे परिसरातील नागरिक, विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

33 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून यात सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे. लागवडीचे संवर्धनही तितकेच महत्वाचे आहे.  प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाचे काम करावे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड

माणगांव तहसील कार्यालय परिसरातही वृक्षारोपण

माणगांव : प्रतिनिधी – येथील तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी (दि. 1) सकाळी उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव -दिघावकर यांच्या हस्ते आणि तहसिलदार प्रियंका आयरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करुन, माणगाव तालुक्याच्या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ  करण्यात आला. यावेळी प्रशाली जाधव दिघावकर यांनी तालुक्यातील जनतेला झाडे लावा झाडे जगवा असा संदेश दिला.   

 महसुल व वनविभागाकडील शासन निर्णयानुसार  सन 2019 मधील पावसाळयात 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दीष्ट निश्चीत करण्यात आले आहे. या उपक्रमानुसार माणगांव महसुल विभागास देण्यात आलेल्या इष्टांकानुसार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ सोमवारी माणगाव तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. माणगांव तालुक्यात महसूल विभागा मार्फत 6850 झाडे लावण्यात येणार असल्याची माहिती यावेळी तहसिलदार प्रियंका आयरे यांनी दिली. या कार्यक्रमास महसूल खात्याचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्यने उपस्थित होते.

वावे गावचा उजाड डोंगर बहरणार

पाली : प्रतिनिधी -सुधागड तालुक्यातील वावे गावासमोरील डोंगर व माळरान उजाड झाले होते. येथील ग्रामस्थांनी या डोंगरावर शनिवारी (दि. 30) पद्धतीने 512 रोपांची  लागवड केली. या वृक्षारोपण मोहिमेसाठी 16 जूनला एकूण 512 खड्डे खोदण्याचे काम पूर्ण झाले होते. त्यात कोणती माती व खत टाकावे आणि त्यांनतर खड्ड्यात कोणत्या प्रकारची रोपे लावावीत याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाकडून घेतली होती. शनिवारी वावे गावातील थोरामोठ्यांसह लहानग्यांनी मिळून 512 खड्यांत रोपे लागवड केली. त्यासाठी वनक्षेत्रपाल समीर शिंदे, वनरक्षक डी. के.तलेले, जी. बी. परिहर, एस. एन. गाडेकर

यांनी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply