पनवेल ः वार्ताहर
लोकनेते दि. बा. पाटील यांनी स्थापन केलेल्या पनवेल येथील हुतात्मा हिराजी पाटील ग्रंथालयांच्या अध्यक्षपदी जे. डी. तांडेल यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. या संस्थेची 10वी वार्षिक सर्वसाधारण सभा पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या सभागहात शुक्रवारी झाली. ग्रंथालयाचे अध्यक्ष अर्थतज्ञ जे. डी. तांडेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस मोठया संस्थेने सदस्य उपस्थित होते. या सभेत सन 2019 ते 2024 या पंचवार्षिक कालावधीसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत तांडेल यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच या सभेत उपाध्यक्ष म्हणून रघुनाथ जोमा ठाकूर, सचिवपदी डी. बी. पाटील, खजिनदार म्हणून विजय गायकर यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे कार्यकारणी सदस्य म्हणून दिलिप साळवी, अंजली भगत, मनस्वी पाटेकर, कमलाकर पवार, मेघा तांडेल, मनिषा पाटील, भगवान म्हात्रे, मनिषा तांडेल, श्याम मोकल, काशिनाथ गोंधळी यांची निवड करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना जे.डी. तांडेल म्हणाले की, बहुजन समाजात वाचन संस्कृती वाढली पाहिजे, हल्ली आयटीच्या युगात वाचनसंस्कृती लोप पावत आहे. परंतु आज या अक्षर माध्यमात जी नवी-नवी पुस्तके बाजारात येत आहेत ती पाहता वाचक या पुस्तकांपासून दूर गेलेला नाही हे जाणवते. ही नवी पुस्तके समाजात नवे विचार व नवे संस्कार घडविणारी आहेत आणि म्हणून लोकनेते दि. बा. पाटील यांच्या विचारानुसार आपणही आपल्या वाचनालया मार्फत ही वाचन संस्कृती वाढविली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक पदाधिकार्यांनी, सदस्यांनी प्रयत्न करून या वाचनालयाचा प्रचार आणि पसार केला पाहिजे. येत्या काही काळात या वाचनालयातर्फे काही साहित्यिक कार्यक्रमही येथे होणार आहेत. त्यामुळे सांस्कृतिक वातावरण निर्माण होईल. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे मत जे.डी. तांडेल यांनी व्यक्त केले. शेवटी ग्रंथालयाचे सचिव रयत सेवक डी. बी. पाटील यांनी उपस्थिताने आभार मानले.