रेवदंडा : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी व लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविल्याने अनेक शाळामधील आरएसपी पथकाचे समादेशक व अधिकार्यांची विशेष पोलीस म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या आदेशानुसार आरएसपी पथकाचे अनेक समादेशक व अधिकारी रायगड जिल्ह्यातील विविध चेकनाक्यावर पोलीस अधिकारी व कर्मचार्यांसमावेत कर्तव्य बजावताना दिसत आहेत. आरएसपी पथकाचे आर. डी. नाईक, आर. डी. म्हात्रे, शिवाजी माने, राजूदास पवार, लियाकत धनसे, आशिष बुल्लू, संतोष पाटील, रागिणी तावडे, कांचन म्हात्रे इत्यादी विशेष पोलीस म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
आरएसपीनी कर्तव्य बजावत असताना आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी, त्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत तसेच त्यांनी कोरोना कृती आराखड्यामधील सूचना अवगत कराव्यात, त्यांच्या जोडीला एक पोलीस अमंलदार नेमावा, पथकातील वरिष्ठ अधिकार्यांना पेट्रोलिंगसाठी नेमावे आदी सूचना पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनी दिल्या आहेत.