धाटाव : प्रतिनिधी
हलदीरामची एजन्सी देतो, असे सांगून रोहा येथील तरुणाची साडेसहा लाख रुपयांची फसवणूक करणार्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हलदीरामची एजन्सी मिळवून देतो, असे रोह्यातील एका तरूणाला तिघाजणांनी सांगितले. चार पैसे मिळतील, असा विचार करुन या तरुणाने त्या तिघांवर विश्वास दाखवला. हलदीरामच्या प्रोडक्टसाठी त्यांनी या तरूणाला वेगवेगळ्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार या तरूणाने एकूण सहा लाख 65 हजार 600 रुपये जमा केले. मात्र हलदीरामचे प्रोडक्टस् मिळाले नाहीत, तेव्हा या तरुणाने त्याबाबत विचारणा केली. त्या भामट्यांनी पुन्हा इन्शुरन्स चार्जेस म्हणून 80 हजार रुपयांची मागणी केली. प्रोडक्टस् किंवा पैसे दोन्ही देण्यास समोरुन टाळाटाळ होत असल्याचे लक्षात येताच शेवटी या तरुणाने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात भादंविक 420, 406, 34, माहिती तंत्रज्ञान अधिनियम, 2000 (2008 चे सुधारणेसह) 66 ल, 66 व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक अघाव करीत आहेत.