Breaking News

कोकणातील उद्ध्वस्त शेतकर्‍याला बांधावर जाऊन तातडीने मदत करा!

आमदार प्रशांत ठाकूर यांचे राज्य सरकारला साकडे

पनवेल ः रामप्रहर वृत्त
लागोपाठ दुसर्‍या वर्षी आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे ऐन हंगामात कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांचे पुरते कंबरडे मोडले असून, केवळ कागदावरचे आदेश आणि घोषणा न करता आंबा बागायतदार व वादळग्रस्त शेतकर्‍यांच्या मदतीसाठी प्रत्यक्ष पॅकेज मिळाले पाहिजे, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे.
कोकणातील हंगामी उत्पन्नाचे सर्व मार्ग तौक्ते चक्रीवादळाने धुवून टाकले असून, कोकणी अर्थव्यवस्थेस यापूर्वी कधीही नव्हता एवढा जबर फटका बसला आहे. कोकणाबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातही आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने तातडीने शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत देण्याची व्यवस्था करावी, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे.
गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने पुरता उद्ध्वस्त झालेला कोकणातील शेतकरी राज्य सरकारने तेव्हा जाहीर केलेल्या मदतीपासून अजूनही वंचितच असताना यंदा तौक्ते वादळाने नवा जबर फटका दिल्याने आंबा उत्पादक, शेतकर्‍यास सावरणे अशक्य झाले आहे. उद्ध्वस्त कोकणास पुन्हा उभे करण्यासाठी आता त्याला थेट मदत मिळाली पाहिजे. राज्य सरकारने आढावा घेण्यात वेळकाढूपणा न करता तातडीने मदतीचे वाटप करून आंबा उत्पादक शेतकर्‍यास दिलासा दिला पाहिजे, याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.
तौक्ते वादळात झालेल्या हानीमुळे किमान पाच वर्षे शेतकर्‍यास डोके वर काढता येणार नाही. पिकांबरोबरच मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले असून असंख्य घरेदारे, गोठे उद्ध्वस्त झाले आहेत. कोकणी माणसासाठी राज्य सरकारकडे कसलेही धोरण नाही, उद्योगांना मदत करण्याची कोणतीही योजना नाही आणि कोकणच्या नियोजनबद्ध विकासाचे कोणतेही मॉडेल सरकारने आखलेले नाही. एकीकडे निसर्गाचा प्रकोप आणि राज्य सरकारची डोळेझाक यांमध्ये कोकणातील शेतकरी भरडला जात आहे. गेल्या वर्षीपासूनची कोरोनामुळे टाळेबंदी आणि वादळाचा तडाखा अशा दुहेरी संकटात त्याला हात देण्यासाठी सरकारने तातडीने मदत करावी. नुकसानग्रस्त शेतकर्‍यास कर्जावरील व्याजमाफी, वीज बिलमाफी आणि कर्जफेडीस मुदतवाढ मिळाली पाहिजे, अशी मागणीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकात केली आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply