आवश्यक तिथे सहकार्याचा हात देणार : मोहन भागवत
नागपूर : प्रतिनिधी
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत दक्ष नागरिक म्हणून कर्तव्य बजावण्याचे काम संघ स्वयंसेवकांनी सुरू केले आहे. प्रशासनाच्या सल्ल्याने व परवानगीने आवश्यक तिथे सहकार्याचा हात दिला जात आहे. समाजानेही सरकारच्या सूचनांचे पालन करून कोरोनावर विजय मिळवण्याचा संकल्प करावा,’ असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. त्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याच्या निमित्ताने सरसंघचालकांनी बुधवारी (दि. 24) संघ स्वयंसेवकांना संबोधित केले. लॉकडाऊन व सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून संघाचे कार्य सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी स्वयंसेवकांना दिल्या. त्याचवेळी देशावर सध्या ओढवलेल्या कोरोनाच्या संकटावरही भाष्य केले. ’करोनाचे संकट मोठे आहे यात वाद नाही, पण समाजाच्या सामूहिक जबाबदारीतून या संकटावर यशस्वीरित्या मात करता येऊ शकते. औषधे व आरोग्याच्या इतर सोयीसुविधा या गोष्टी नंतरच्या आहेत. त्या सहाय्यक आहेत, मात्र या विषाणू युद्धात लढताना पहिली आणि महत्त्वाची गरज आहे ती संसर्ग टाळण्याची. ’सोशल डिस्टन्सिंग’ हीच या लढाईतील प्रमुख बाब आहे. ती समाजाने पाळावी,’ असे भागवत म्हणाले.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने समाजोपयोगी कार्यात मोलाचा वाटा उचलत असतो. आताही ते सरसावले आहेत.