Breaking News

कर्नाळा बँक घोटाळ्याशी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा संबंध नसल्याचा सहकार खात्याचा निर्वाळा

खोटेपणा करणार्‍यांचे तोंड झाले कडू

पनवेल ः रामप्रहर वृत्त
कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या आर्थिक घोटाळ्याशी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा कोणत्याही प्रकारे संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने कर्नाळा बँकेचे चौकशी अधिकारी आणि सहकार खात्याचे उपनिबंधक विशाल जाधवर यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दोषमुक्त करून त्यांचे नाव या चौकशीतून वगळण्याचा निर्णय एका आदेशानुसार जाहीर केला आहे. त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव कोणत्या ना कोणत्या खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा खटाटोप करणार्‍यांचे तोंड मात्र कडू झाल्याचे समजते.
कर्नाळा नागरी सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळ्याची चौकशी सध्या सुरू आहे. 512 कोटी 54 लाख 53 हजार 286 रुपयांचा हा घोटाळा आहे. त्यामुळे बँकेचे व त्यायोगे बँकेच्या खातेदारांचेही आर्थिक नुकसान झाले आहे. त्यासाठी बँक स्थापन झाल्यापासून या बँकेवर संचालक म्हणून काम केलेल्या 38 जणांना चौकशीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेही नाव होते.
या नोटीशीला उत्तर देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संपूर्ण वस्तुस्थिती उपनिबंधकांसमोर लेखी मांडली. कर्नाळा बँकेची नोंदणी 2 मार्च 1996 रोजी झाली. या कर्नाळा बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 26 जून 1996 रोजी परवाना दिला आणि बँकेचे कामकाज 5 ऑगस्ट 1996 रोजी सुरू झाले.
लोकनेते रामशेठ ठाकूर हे 2 मार्च 1996पासून संचालक होते, मात्र आपल्या कामातून त्यांना वेळ मिळत नसल्याने त्यांनी स्वत:च संचालक म्हणून काम करण्यास असमर्थतता व्यक्त केली. त्यामुळे त्यांचे नाव संचालक मंडळातून 11 जून 1997 रोजी कमी करण्यात आले. अशा प्रकारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कर्नाळा बँकेवर संचालक म्हणून केवळ नऊ महिने सहा दिवसच काम केले होते. त्यानंतर त्यांनी कधीही कर्नाळा बँकेचे संचालक अथवा पदाधिकारी म्हणून बँकेच्या कारभारात सहभाग घेतला नाही.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपला खुलासा सहकार उपनिबंधकांना लेखी कळविला. 1997पासून मी आजपर्यंत कर्नाळा बँकेच्या संचालक वा अन्य कोणत्याही पदावर नसल्याने अहवालात नमूद केलेल्या कालावधीत झालेल्या या घोटाळ्याशी माझा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे त्यांनी खुलाशात स्पष्ट केले.
लेखापरिक्षणातील निरीक्षणांनुसार कर्नाळा बँकेतील भ्रष्टाचार हा 2013पासून करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे सहकार खात्याच्या उपनिबंधकांनी या आर्थिक
घोटाळ्याच्या चौकशीतूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव पूर्णपणे वगळण्याचा निर्णय घेतला असून तसा आदेशही दिला आहे. या प्रकरणी अ‍ॅड. संपतराव पवार, अ‍ॅड. श्रीकांत गावंड आणि विनायक कोळी यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने काम पाहिले.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply